माणुसकीला काळिमा फासणारी घटना, बिलासाठी कोरोना मृतदेह ठेवला तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’ मध्ये; खासदार बारणे पोहोचले थेट रुग्णालयात…

तळेगांव दाभाडे येथील मायमर कॉलेजमधील प्रकार

रोहित खर्गे
विभागीय संपादक

तळेगाव दाभाडे – ३ मे २०२१

  • तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण, पैसे न दिल्याने कॉलेजने मृतदेह देण्यास नकार दिला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. पैशासाठी तीन दिवस कोरोनाचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी याची तक्रार करताच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट कॉलेज गाठले. पैशांसाठी तीन दिवस मृतदेह ठेवाल्याचा जाब विचारला. त्यानंतर कॉलेजने मृतदेह देण्याची तयारी दर्शविली. खासदार बारणे यांनी हा प्रकार
    मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या कानावर घातला आहे.

तळेगांव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलजवळ मायमर मेडिकल कॉलेज आहे. त्यांनी कॉलेजमध्ये 200 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. येथे तीन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान गणेश लोके या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, बील दिले नसल्याने कॉलेजने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होती. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे जनसेवा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या मोफत अन्न छत्राला भेट देण्यासाठी आज सोमवारी आले होते. तिथे गणेश लोके यांचा मुलगा खासदार बारणे यांच्याकडे आला. कॉलेजची तक्रार त्याने खासदार बारणे यांच्याकडे केली. कोरोनाने तीन दिवसांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असून बील दिले नाही म्हणून मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच खासदार बारणे यांनी थेट कॉलेज गाठले. पोलीस निरीक्षक शहाजी पाटील यांनाही बोलून घेतले. जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे, शहरप्रमुख दत्ता भेगडे, माजी शहरप्रमुख मुन्ना मोरे त्यांच्यासोबत होते.

कॉलेजच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे यांच्याशी चर्चा केली. कोरोनाचा मृतदेह पैशांसाठी तीन ते चार दिवस ठेवणे अतिशय चुकीचे आहे. पैशासाठी छळवणूक करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरणे संतापजनक असल्याचे खेडेबोल खासदार बारणे यांनी सुनावले. मृत्यू झालेल्या गणेश लोके यांच्या घरातील चारजण पॉझिटिव्ह आहेत. तो मुलगा पण कदाचित पॉझिटिव्ह असू शकतो. तो पैशासाठी इकडे-तिकडे फिरत आहे. केंद्र, राज्य सरकार कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतात. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे गोळा करण्यासाठी बाहेर फिरावे लागत आहे. कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक हलाखीत आहे. ते बाहेर फिरल्याने कोरोनाचा प्रसार होतो. केवळ पैशांसाठी मृतदेह ठेवणे हे अतिशय भयानक असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर कॉलेजने मृतदेह देण्याची तयारी दर्शविली.

खासदार बारणे म्हणाले, “बील भरले नाही म्हणून कोरोनाचा मृतदेह चार दिवस ठेवणे अतिशय चुकीचे आहे. मायमर कॉलेजमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आणि गंभीर आहे. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे. दुसरीकडे हॉस्पिटलच्या लोकांनी कोरोनाच्या नावाखाली व्यवसाय चालू केला आहे. मोफत उपचाराची सुविधा असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर आज तळेगांवमध्ये असा प्रकार घडला. याची शासनाने दखल घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओएसडी सुधीर नाईक यांना फोन करून ही घटना सांगितली. स्वतः लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात अशी विनंती केली”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *