बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर
विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड हे सख्खे भाऊ. विशालचा मृत्यू २२ एप्रिल रोजी झाला. तर तुषारचा मृत्यू ३ मे रोजी झाला. बरोबर दहा दिवसांत दोन कर्त्या सवरत्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ज्यांच्या नशिबात आले, ते कृष्णकांत गायकवाड वय वर्ष ६२, तर पत्नी मंगल कृष्णकांत गायकवाड वय वर्ष ५६, म्हातारपणी डोळ्यांदेखत उध्वस्त झालेला संसार पाहून शून्यात नजर लावून बसलेले दिसतायत. आमचा देव चोरीला गेला हो.. म्हणून जेव्हा टाहो फोडला तेव्हा काळही क्षणभर थांबला असेल..
काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना मलठण, ता. शिरूर येथे घडली आणि बघता बघता एक संसार धुळीला मिळाला.
गायकवाड कुटुंबियांचे मूळ गाव सूर्या सांगवी, ता. पारनेर, जी. अहमदनगर. कृष्णकांत गायकवाड ह्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मलठण येथे काही वर्षांपूर्वी आले. मोलमजुरी करीत प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढत असताना, प्रपंचवेलीवर विशाल, सागर, प्रियांका व तुषार ही फुले उमलली. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुले मोठी झाली. विशाल १० वी, तर तुषार एम. ए.(हिंदी) झाला. नोकरीच्या शोधात निराश झाल्यावर विशाल व तुषारने मलठण येथेच शौर्य कॉम्पुटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व्यवसाय उभारला. मनमिळाऊ स्वभाव, गरिबीची जाणीव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय भरभराटीला आला. मधल्या काळात विशाल, सागर आणि प्रियांका यांची लग्न झाली. तुषार अविवाहित होता. पण यंदा त्याचेही लग्न जुळून येत होते. पण याचवेळी नियती ह्या कुटुंबाशी निर्दयपणे एक डाव खेळत होती. हे त्यांना कळलेही नाही.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका ह्या कुटुंबाला बसला. विशालला कोरोनाची लागण झाली. दुर्लक्ष झाले आणि आजार अंगावर काढला. त्याची परिणती म्हणून दि. २२ एप्रिल २०२१ रोजी विशालचा मृत्यू झाला. त्याचे सर्व अंत्यसंस्कार तुषारने केले आणि दोन दिवसात तोही पॉझिटिव्ह आला. त्रास होऊ लागल्याने तुषारला वेदांत हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र ऑक्सिजन कमी आल्याने १० दिवस त्यानेही मृत्यूशी झुंज दिली. ह्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, अनेक मित्रमंडळींनि निधी जमविला व त्याला मानसिक आणि आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. अखेर मृत्यूशी झुंज देताना तुषारनेही हार पत्करली आणि आज ३ मे २०२१ रोजी, पहाटे तोही अनंताच्या प्रवासाला निघून गेला.
‘आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो…. त्यांना कुठे शोधू?… हा वृद्ध मातापित्याचा टाहो आसमंतात विरून गेला….!!
या घटनेत दोन्ही सख्या भावांचा अवघ्या दहाच दिवसांत मृत्यू झाल्याने, मलठण व परिसरात शोककळा पसरली आहे.
शब्दांकन – प्राचार्य अनिल शिंदे, मलठण