महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आले रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर..

              आंबेगाव तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या सहकार्याने १मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गावात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती उषाताई कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, कळंब च्या सरपंच राजश्रीताई भालेराव, ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे यांच्या उपस्थित करण्यात आले.


        कळंब ग्रामपंचयात ने राबवलेल्या या रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्ट मध्ये ८० नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात ८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. सदर नागरिकांना त्यांच्यात दिसणाऱ्या लक्षणानुसार  डॉक्टरांच्या सल्ल्याने होम कोरोन्टाईन किंवा कोविड सेंटर ला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजश्रीताई भालेराव यांनी दिली. या प्रसंगी माजी सभापती वसंतराव भालेराव यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करताना राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून तसेच या शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याचे आवाहन केले. शिबिरादरम्यान कळंब ग्रामपंचायत तसेच सन २०१०/११ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे कोरोना योद्धा म्हणून आरोग्य सेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, स्थानिक डॉक्टर, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका या सर्वांना सन्मानचिन्ह व N95 मास्क देऊन माजी सभापती उषाताई कानडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या रक्तदान शिबिरातील रक्ताचे संकलन मोरया ब्लडबँक चिंचवड कडून करण्यात आले.


          सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कळंब चे सर्व कर्मचारी, कळंब तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीशेठ भालेराव, उद्योजक नितीन भालेराव, रोहन कानडे, अक्षय कानडे व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच  डॉ.बाळकृष्ण थोरात व डॉ. अमोल थोरात यांच्या वैद्यकीय मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडल्याचे सरपंच राजश्रीताई भालेराव यांनी सांगून आभार मानले. यावेळी त्यांनी गावातील सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *