पिंपळेगुरवमधील शुभम गायकवाडला सलाम!; वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी कोविड हॉस्पिटलला ५० हजारांची मदत…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १ मे २०२१
पिंपळेगुरवमधील शुभम गायकवाड या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसावर होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आयुश्री कोविड हॉस्पिटलला ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते हॉस्पिटल प्रशासनाला धनादेश सुपूर्त करण्यात आला. कोरोना महामारीत समाजाला आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून शुभमने कोरोना रुग्णांना उपचारांसाठी मदत देऊन माणुसकी जपली आहे.

या मदतीबाबत शुभम गायकवाड म्हणाला, “मी दरवर्षी माझा वाढदिवस थाटामाटात साजरा करत असतो. पण कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे आज लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोणाच्या नोकऱ्या गेल्यात, कोणाचे व्यवसाय बंद झाले, कोणाकडे उपचारासाठी पैसे नाहीत, कोणाचे उपचाराअभावी मृत्यू झाले, अशा अनेक कारणांमुळे समाजातील हे विदारक चित्र पाहून माझे मन हेलावले आहे. त्यामुळे मी यावर्षी वाढदिवसाला एकही रुपया खर्च न करता गोरगरिबांसाठी छोटीशी मदत करण्याचा निर्णय घेतला. म्हणून ५० हजार रुपये आयुश्री कोवीड हॉस्पिटला सुपूर्त केले आहेत.”

शुभमच्या या निर्णयाबद्दल बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, “शुभमचा आदर्श सर्व तरुणांनी घेण्याची ही वेळ आहे. कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना जमेल तशी आपल्या परीने तरूणांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.”

यावेळी माऊली जगताप, शुभम गायकवाड, प्राची गायकवाड, मिलिंद कंक, सतीश कांबळे, राहुल साळुंके, अक्षय काशीद, संजय मराठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *