शिरूर शहरातील विशेष मुलींच्या शासकीय निवासी शाळेत कोरोनाचा कहर…

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

शिरूर शहरातील विशेष मुलींच्या शासकीय निवासी शाळेत कोरोनाचा कहर झाल्याने, शिरूर शहरात खळबळ उडाली असून, शिरूरकर नागरिक या दिव्यांग मुलींसाठी खूप भावनिक झाले आहेत. या मुलींसाठी आता चांगली वैद्यकीय उपचार सेवा देण्याची गरज आहे.

शिरूर येथील रहिवासी मुलींच्या शाळेतील ४७ मुली व ९ शिक्षक, अशा ५६ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती, शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पाटील यांनी दिली आहे.

तर, याबाबत शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली होती. त्यामुळे या शाळेतील सर्वच निवासी मुलींची व कर्मचाऱ्यांची अ‍ॅण्टीजन टेस्ट, ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे करण्यात आली. त्यामध्ये येथील अनेक मुली व कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. येथील एक शिक्षक बाहेर गावाहुन जाऊन येऊन करत असल्याने, या मुलींना कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तर निवासी असणाऱ्या या शासकीय संस्थेतील कर्मचारी, बाहेर गावाहून जाऊन येऊन करतातच कसे ? असा संतप्त सवाल जनतेतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पुढील सखोल चौकशी शासनाकडून होणार असल्याचे समजतेय. तर या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर आता, त्यामुळे कठोर कारवाई होऊ शकतेय.

दरम्यान या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची वैद्यकिय तपासणी, शासकीय रुग्णालयात करून औषध उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. तर त्रास होत असलेल्या एका मुलीवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. प्रशासकिय पातळीवरही या दिव्यांग मुलींच्या उपचारासाठी चांगले आरोग्य पथक नेमण्याची गरज असल्याचे, शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या मुलींना बोलता येत नाही, ऐकता येत नाही व काही समजत नाही, अशा दिव्यांग मुलींच्या उपचारासाठी मदतीचा हात देण्याची आता खरी गरज आहे.

या शासकीय दिव्यांग शाळेतील अनेक मुली व तेथील कर्मचारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, एका कर्मचाऱ्याची तब्बेत गंभीर असून त्याला ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तर बाकीच्यांना त्या शाळेतच क्वारंटाईन केले असून, तेथेच औषधोपचार सुरू आहेत.

दरम्यान, शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली असुन, या परिसराचे नगरपरिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी, फवारणी करण्यात आली असल्याची माहीती, शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *