ओतूरच्या जाकमाथा येथे आढळले बिबट्याचे दोन बछडे ; वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

ओतूर येथून जवळच असणाऱ्या जाक माथा शिवारात उसाची तोडणी सुरू असताना अचानक बिबट्यांचे दोन बछडे आढळून आले तर ओतुर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस केले असल्याची माहिती ओतुर वनविभाग परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ओतूरच्या जाक माथा येथील येथील शेतकरी श्री. वैभव विलास तांबे यांचे शेतात ऊस तोडी दरम्यान ऊस तोड मजूरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. ही बाब संबंधित मजुरांनी ऊस शेती मालक वैभव विलास तांबे यांना सांगितली. श्री तांबे यांनी तत्काळ ओतुर वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधला . त्यानंतर तात्काळ वन विभागाचे वनरक्षक श्री.सुदाम राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओतुर वन वनपरिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री.योगेश घोडके व वनरक्षक श्री.अतुल वाघोले हे देखील घटनास्थळी उपस्थित झाले. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संरक्षणाने श्री तांबे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम सुरळीत पार पडले. दरम्यान माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्राचे डॉ.निखिल बनगर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे अधिकारी व माणिकडोह टीम यांनी हे दोन्ही बिबट बछडे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता हे दोन्ही बछडे नर जातीचे असल्याचे निदर्शनास आले . यापूर्वी दि. ०६/०४/२०२१ रोजी याच परिसरात ऊस तोडी दरम्यान आढळून आलेले व सुखरूप पणे मादीच्या कुशीत विसावलेले हेच ते बछडे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री घोडके यांनी सांगितले. काल देखील सायंकाळी पुन्हा एकदा मादिच्या भेटीसाठी बछडे ठेवले व ते यशस्वीपणे आईच्या कुशीत विसावले. वन परिक्षेत्र अधिकारी श्री.घोडके साहेब यांनी असे सांगितले की, हे बछडे त्यांच्या शरीरात लावलेल्या मायक्रो चीपवरून ओळखण्यात आले आहे. मागील २० दिवसांत बछड्यांच्या वाढीचा वेग कमालीचा असून ते अतिशय सुदॄढ स्थितीत आहेत. दोन्ही ठिकाणांचा विचार करता मादिने बछडे ५०० मी. दूर नेले होते.