ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
ओतूर व परिसरात आज दुपारी पावणे पाच ते पावणे सहा या दरम्यान विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले. आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता दुपारी साडेचार / पावणे पाचच्या दरम्यान अवकाळी पावसास सुरुवात झाली. या पावसाने कांदे आणि गव्हासारख्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे प्रगतशील शेतकरी सचिन गुलाबराव पानसरे ,बबनराव महादेव गाढवे व अभिमन्यू डुंबरे यांनी सांगितले. सध्या शेतामध्ये गहू व कांदे काढणीची कामे जवळपास आटोपली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले काढलेले कांदे बराखीमध्ये साठवून ठेवले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांचे कांदे शेतातच आरणीमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे तर ज्या शेतकर्यांनी गहू कापून ठेवले पण मळणी यंत्राद्वारे करायचे बाकी राहिले आहेत अशा गहू पिकाचेही नुकसान झाले आहे .आवळी रस्ता, पानसरे पट , फापाळे शिवार, ब्राम्हणवाडा रस्ता, कपर्दिकेश्वर मंदिर रस्ता आदी परिसरात सायंकाळी फिरायला, चालायला जाणाऱ्या नागरिकांना मात्र आज अवकाळी पावसामुळे घरीच थांबावे लागले . तर काहींना निम्म्या रस्त्यातूनच परत माघारी फिरावे लागल्याचे बबनराव गाढवे व अभिमन्यू डुंबरे यांनी सांगितले.