नवीन भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव रुग्णालयांमध्ये महापालिका उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड : दि २६ एप्रिल कोरोना साथीच्या काळात देशाच्या बर्‍याच भागात लोकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये ऑक्सीजनची गरज ओळखून आतापर्यंत जवळपास तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनाच्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट बसविण्यात येणार आहे. शहरातील ऑक्सिजनच्या कमतरता व भविष्यातील ऑक्सीजनची गरज लक्षात घेवून ‍ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून देखील भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. ऑक्सीजन प्लांट निर्मीती करणा-या कंपनीकडे ऑक्सीजन प्लांटची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने पुढे याचीही कमतरता पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने तातडीने सदर ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

‍ सद्यस्थितीमध्ये शहरात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावाधाव होत आहे. ऑक्सीजनच्या अभावामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडतांना दिसून येत आहे. भविष्यामध्ये शहरात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी ९६० एलपीएम व थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास ४५० ऑक्सीजन बेड व ५० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.

        ऑक्सीजन तयार करणा-या कंपन्यांकडे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात मागणी वाढत असल्याने या कंपन्यांकडून शहरातील रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार ठिकाणी ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविल्यामुळे ऑक्सीजनचा कायमचा प्रश्न मिटणार असून यामुळे मोठया प्रमाणात ऑक्सीजनची बचत होणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *