राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते संदीप काटे यांचे आवाहन

रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या प्रसिध्द करा – संदीप काटे

नारायणगाव (किरण वाजगे)
सध्या पुणे, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रासह संपूर्ण देश विदेशामध्ये कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेकांचे मृत्यू होत असल्याची माहिती प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे.
मात्र खरी परिस्थिती यापेक्षा वेगळी असून त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवडमधील बाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे व्हायची गती अत्यंत चांगली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच पॅरामेडिकल स्टाफ आहोरात्र कार्यरत असल्यामुळे हजारो रुग्ण कोरोनावर यशश्वी मात करत आहेत. परंतु, कोरोनाबाबत नकारात्मक बातम्या सर्व प्रकारची मीडिया व सोशल मीडियातून प्रसारीत होत असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे मनोधैर्य खचत चालले आहे. यासाठी रुग्णांचे मनोबल वाढवून वृत्तपत्र व डीजिटल मीडिया माध्यम संस्थांनी कोरोनासंदर्भात सकारात्मक बातम्या प्रसिध्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आजपर्यंत १ लाख ८० हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सुमारे १ लाख ६५ हजार पेक्षा जास्त रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुमारे ८ हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, २ हजार ५५१ जणांनी आपला प्राण गमविला आहे. याशिवाय, हजारो नागरिक कोरोना केअर सेंटरमध्ये काळजी घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यातील हजार नागरिकांचा वैद्यकीय अहवाल प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट अत्यंत चांगला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील डॉक्टर्स, नर्स तसेच पॅरामेडिकल स्टाफ आहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात केलेल्या नागरिकांनी आपल्याला आलेला सकारात्मक अनुभव व्हिडिओ अथवा फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करावा, असेही काटे यांनी म्हटले आहे.
कोरोनाशी संबंधित प्रसार माध्यमातून येणा-या नकारात्मक बातम्या वाचने टाळावे. अशा बातम्या सोशल मीडियातून व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नकारात्मक माहिती उपचार घेत असलेल्या रुग्णांपर्यंत पोचल्यास त्याचे मनोधैर्य खचते. शिवाय कोरोना विषाणुशी लढण्यासाठी रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. शहरात केवळ २ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. मृत्यू झालेल्यांना आपण श्रध्दांजली जरूर अर्पण केली पाहिजे. परंतु, त्यांच्याशी निगडीत भितीदायक माहिती प्रसारीत करणे टाळले पाहिजे. कारण, अशा माहितीमुळे रुग्णांचे माणसिक खच्चीकरण होऊन त्याची कोरोनाशी लढाई अंतिम टप्प्यावर येण्याची शक्यता असते. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या वृत्तपत्र आणि डीजिटल मीडिया माध्यमातून प्रसिध्द झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल. तसेच, सोशल मीडियाद्वारे खच्चीकरण करणारी माहिती व्हायरल करणा-यांवर पोलीस व पालिकेच्या प्रशासन यंत्रणेने लक्ष ठेवले पाहिजे. संबंधितांना समज देऊन कायदेशीर कारवाईची भिती घातली पाहिजे, असेही काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *