रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला टप्पा मिळाला ; कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार देण्यास सुरुवात…..ॲड. नितीन लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. 20 एप्रिल 2021 पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीच्या 15 एप्रिलच्या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावानुसार आज मंगळवारी (दि. 20 एप्रिल 2021) 960 इंजेक्शनचा पहिला टप्पा महापालिकेला मिळाला आहे. तसेच मागील स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना उपचारासाठी मनपाच्या विविध रुग्णालयात आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल असणा-या रुग्णांना पौष्टिक आहार देण्यास मंगळवार (दि. 20 एप्रिल) पासून सुरुवात झाली आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
मागील स्थायी समितीच्या सभेत 7050 रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा ठराव पास करण्यात आला होता. कोरोनाच्या उपचारासाठी वायसीएम, नवीन भोसरी, जीजामाता, तालेरा आणि आकुर्डी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल आहेत. यातील काही रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जातात. परंतू मागील पंधरवड्यात या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मनपाच्या रुग्णालयात दाखल रुग्णांना मनपाच्या वतीने मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या गरजू रुग्णांना याचा उपयोग होईल.
तसेच मनपा विविध रुग्णालयात आणि संस्थापक विलगीकरण केंद्रात दाखल असणा-या कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून पुरवठादारांना प्रतीताट पन्नास रुपयांपर्यंत वाढ देण्याचा ठराव पास करण्यात आला होता. त्यानुसार आज मंगळवार (दि. 20 एप्रिल) पासून वाढिव पौष्टिक आहार रुग्णांना देण्यास सुरुवात झाली आहे. मंजूर झालेल्या ठरावानुसार सर्व रुग्णांना सकाळी नाष्टा, चहाबरोबर दोन उकडलेली अंडी, दुपारच्या जेवणात वरण, भात, चपाती, सुकी भाजी आणि पातळ भाजी, सॅलड देण्यात येणार आहे. सायंकाळी चहा, रात्रीच्या जेवणात वरण, भात, सुकी भाजी, पातळ भाजी, सॅलड आणि शेंगदाणा किंवा राजगी-याचे दोन लाडू तसेच दोन पाण्याच्या बाटल्या देण्यास आज पासून सुरुवात झाली आहे अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *