रोहित खर्गे
विभागीय संपादक
उरण- दि २० एप्रिल २०२१ जेएनपीटीने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव आहे. जेएनपीटी प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना आवश्यक असलेले रेमिडिसेवीर इंजेक्शन उपलब्ध करावे. डॉक्टरसह इतर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कोविड हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलण्याची ग्वाही जेएनपीटी व्यवस्थापनाने दिली आहे.
खासदार बारणे यांनी उरण तालुका, जेएनपीटी परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जेएनपीटीच्या कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार बारणे यांनी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासोबत बैठक घेतली. माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उरण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, विश्वस्त भूषण पाटील बैठकीला उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, उरण भागात जेएनपीटीने 50 बेडचे हॉस्पिटल उभे केले आहे. परंतु, तिथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा नाही. मनुष्यबळ अपुरे आहे. जेएनपीटीने खासगी माध्यमातून कर्मचारी उपलब्ध करून घ्यावेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करावी. रेमिडिसेवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करुन द्यावे. कोविड हॉस्पिटल कार्यान्वित राहण्यासाठी जेएनपीटीने सर्वतोपरी मदत करावी, अशी सूचना केली. त्यावर जेएनपीटी व्यवस्थापनाने जो खर्च लागेल तो देण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या आठ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले.
जेएनपीटीमध्ये कस्टम, जेएनपीटी पोर्टमध्ये काम करणा-या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सिडको आणि जेएनपीटीने या भागातील अनेक जमिनी घेतल्या आहेत. परंतु, या भागातील नागरिकांना हॉस्पिटल, इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. सुविधा उपलब्ध करून देणे जेएनपीटीचे कर्तव्य आहे. जेएनपीटीकडून सीएसआर निधी थेट केंद्र सरकार, इतर राज्याला दिला जातो. परंतु, सीएसआरच्या माध्यमातून उरण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
त्याचबरोबर उरणचे तहसीलदार, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर यांच्या बरोबर सिडकोने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये बैठक घेतली. तिथे असलेल्या गैरसोयी दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. कोरोना रुग्णाबाबत खबरदारी घेण्याचे सांगितले, असल्याचेही त्यांनी सांगितले.