पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील गोरगरीब कोरोना रुग्णांना असेच मरू द्यायचे का?; आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे यासाठी व्यक्त केला संताप…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १९ एप्रिल २०२१
गोरगरीब कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात यावी म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप गेल्या वर्षभरापासून सरकारकडे पत्रव्यवहार करत आहेत. पण सरकारच्या पातळीवर गोरगरीब कोरोना रुग्णांचा सहानुभीतीने विचार केला जात नसल्याने संतापलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना खरमरीत शब्दांत पत्र लिहिले आहे. गोरगरीब कोरोना रुग्णांनी उपचार घ्यायचे नाहीत का?, की त्यांना केवळ आश्वासने देऊन असेच मरू द्यायचे आहे?, अशा शब्दांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रातून आपला संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब कोरोना रुग्णांना आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. दरम्यान, गेल्या वर्षी २१ मे २०२० रोजी राज्य सरकारने सर्व धर्मादाय व खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावेत, असा आदेश काढलेला आहे. परंतु, या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब कोरोना रुग्णांना तेथील उपचाराचा खर्च परवडणारा नाही. या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांकडून कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते, याच्या अनेक तक्रारी सर्व लोकप्रतिनिधींकडे प्राप्त होत आहेत. शासकीय पातळीवरून अशा रुग्णालयांवर कारवाईचे केवळ आश्वासन दिले जाते. होत मात्र काहीच नाही. लूट झालेल्या रुग्णांच्या हाती काहीच पडत नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे उपचार मिळत नाहीत म्हणून अनेक रुग्णांचा जीव जात आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परिस्थिती गंभीर होत असताना याला राज्य सरकारला जबाबदार धरायचे नाही तर कोणाला जबाबदार धरायचे हा प्रश्न आहे. या सर्व भयानक परिस्थितीत गोरगरीब कोरोना रुग्णांनाही उपचार मिळावेत यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरू शकतो. या योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतील. त्यासाठी मी गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करत आहे. सर्व धर्मदाय रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू झाल्यास सरकारी रुग्णालयांवर येणारा ताण तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणाऱ्या आर्थिक लुटीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. परंतु, वारंवार मागणी करूनही कोरोना झालेल्या गोरगरीब रुग्णांबाबत सरकारच्या पातळीवर साहनुभूतीने विचार केला जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

कोरोनाची दुसरी लाट भयावह असल्याचे सरकार सुद्धा कबुल करत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या पातळीवर गोरगरीब रुग्णांचा विचार होणार नसेल तर कोणाचा विचार होणार आहे. गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार घेऊन आपला जीव वाचवण्याचा अधिकार नाही का?, अशा रुग्णांनी आपली आर्थिक लूट ही पाचवीलाच पुजलेली आहे असेच समजायचे का?, त्यांनी दररोज केवळ आश्वासनांवरच स्वतःची बोळवण करून घ्यायची का?, त्यांना असेच मरू द्यायचे का?, अशा शब्दांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या रुग्णांना सिटीस्कॅन, एक्सरे तसेच एचआरसीटी टेस्टसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठविले जाते. तेथेही समान्य रुग्णांची लूट होत आहे. त्यामुळे जसे कोरोना टेस्टसाठी राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत, त्याच धर्तीवर सिटीस्कॅन, एक्सरे तसेच एचआरसीटी टेस्टसाठी दर निश्चित करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *