कोरोना रुग्णांना मिळणार अंडी, शेंगदाणा लाडू…..ॲड. नितीन लांडगे

पिंपरी दि. १७ एप्रिल २०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल असणा-या रुग्णांना आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात (इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन सेंटर – ट्रिपल सी) दाखल असणा-या रुग्णांना अंडी आणि शेंगदाण्याचा लाडूचा समावेश असणारे चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येणार असल्याची महिती पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
गुरुवारी (दि. 15 एप्रिल) स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सदस्य मिनलताई यादव, निता पाडाळे, सुलक्षणा शिलवंत – धर, शशिकांत कदम यांनी कोरोनाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांना प्रोटीन युक्त आहार देण्याची आणि जेवण पुरवणा-या संस्थांची महागाई आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे दरवाढ करुन देण्याची मागणी विचारात घ्यावी अशी मागणी केली. जेवण देणारे पुरवठादार मागील एक वर्षापासून प्रती मागणी 180 रुपये प्रमाणे सेवा देत आहेत.
पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएम, नविन भोसरी, आकुर्डी, जीजामाता, तालेरा आणि जम्बो कोविड रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी हजारो रुग्ण दाखल आहेत. येथिल रुग्णांना आणि कर्मचा-यांना गरजेनुसार दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा, एक वेळचा नाष्टा आणि दोन पाण्याच्या बाटल्या देण्यात येतात. जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, सॅलड यांचा समावेश असतो. या जेवणात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. प्रतिदिन, प्रतिमाणसी रुपये 180/- हा दर मागिल वर्षीचा आहे. बारा महिण्यात वाढलेली महागाई, इंधन दरवाढ विचारात घेऊन पुरवठादारांना प्रतिमाणसी, प्रतिदिन पन्नास रुपयांपर्यंत दरवाढ आणि या जेवणात रोज अंडी आणि शेंगदाण्याच्या लाडूचा समावेश करण्यात यावा असा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. या पुरवठादारांच्या जेवणाचा दर्जा चांगला रहावा यासाठी आयुक्तांनी भरारी पथक नेमावे. असेही या बैठकीत ठरले. अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *