![](https://i0.wp.com/aaplaawajnews.com/wp-content/uploads/2021/04/IMG-20210415-WA0020.jpg?resize=1024%2C461&ssl=1)
रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि. १५ एप्रिल २०२१
कोविडची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
![](https://i0.wp.com/aaplaawajnews.com/wp-content/uploads/2021/04/IMG-20210415-WA0022.jpg?resize=1024%2C461&ssl=1)
कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. यामुळे या आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर आवाज उठवुन राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेवुन राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक निर्बंध, लॉकडाऊन करणे आवश्यक वाटत आहे. पण, घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे. यामुळे प्रथम लॉकडाऊनचा फटका ज्यांना ज्यांना बसू शकतो, त्या सर्वांना पॅकेज देणे आवश्यक आहे, अशी मागणी केली होती. परंतु अशा सामान्य घटकांचा विचार न करता तोंडाला पाने पुसणारे तुटपुंजे पॅकेज जाहीर करुन राज्यशासनाने लॉकडाऊन करण्याचा अट्टहास केला. यामुळे गोरगरीब, कामगार, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
![](https://i0.wp.com/aaplaawajnews.com/wp-content/uploads/2021/04/IMG-20210415-WA0021.jpg?resize=1024%2C461&ssl=1)
पारंपारिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोकांचे कोविडमुळे संपुर्ण व्यवसाय उद्वस्त झाले आहेत. अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देणेसाठी लॉकडाऊन काळात महापालिकेने आर्थिक मदत करावी या संदर्भात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी दि. १५ एप्रिल च्या पत्राद्वारे मागणी केली. तसेच, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांनीदेखील याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आज झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यामध्ये अशी स्वतंत्र मदत करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका ठरली असुन मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.