तमाशा क्षेत्रातील सुप्रसिद्ध तरुण खलनायक दत्ता नेटके पेठकर, यांचे आंबेगाव तालुक्यातील पेठ या मूळ गावी दुःखद निधन…

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

पुणे जिल्ह्यातील पेठ येथील नेटके परिवार म्हणजे, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लोक कलावंतांचा परिवार. वगसाम्राट दत्ता नेटके हे देखील त्यातीलच एक.
दत्ता नेटके यांनी, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ, भिका-भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, यांसारख्या मोठ्या तमाशा फडांमध्ये काम केलेले होते.
तमाशा फडातील त्यांचा प्रवेश झाला तो दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्या तमाशा फडातून. त्यानंतर रामचंद्र वाडेकर, मंगला बनसोडे नारायणगावकर, मालती इनामदार नारायणगावकर, रघुवीर खेडकर , भिका भीमा सांगवीकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांसारख्या मोठ्या तमाशा फडांमधून त्यांनी उत्तमरीत्या कामे करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तमाशा क्षेत्रातील संध्या नावाच्या नृत्यांगणा देखील प्रसिद्ध होत्या.

त्यांचा त्यांनी पत्नी म्हणून स्वीकार करून, एकत्रित या पती पत्नीने कलेच्या क्षेत्राला वाहून घेतले होते. परंतु अर्ध्यावरच आपला संसार सोडून त्यांनी जगाचा आज निरोप घेतल्याने, सर्वांनीच हळहळ व्यक्त केलीय. दत्तात्रय मारुती नेटके यांच्या पछ्यात पत्नी संध्या, मुलगा शिवम तसेच सात भाऊ व तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.
कलाकार म्हणून दत्ता नेटके तमाशा क्षेत्रामधील मागील पंचवीस – तीस वर्ष कार्यरत होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून तमाशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. तमाशा कलेची आवड होती, परंतु घराण्याला तमाशा क्षेत्राचा कुठलाही वारसा त्यांना लाभला नव्हता. तमाशा क्षेत्रातल्या वगनाट्यातील भूमिकांना न्याय देण्याचं काम त्यानी केले. दत्ता नेटके यांनी तमाशा क्षेत्रामध्ये प्रवेश केला तो इयत्ता आठवी पास झाल्यानंतर.


तमाशा क्षेत्रातील बापू बिरू वाटेगावकर, तांब्याचा विष्णू बाळा पाटील यासारख्या वगनाट्यातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या.
गरिबीमुळे कशी बशी इयत्ता ८ वि शिकलेला हा माणूस, अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांना लाजवेल असा जिवंत अभिनय, आणि तोही कुठलाही रीटेक न घेता किंवा कुठलाही कट न घेता, तमाशाच्या रंगमंचावर तासन तास करत होता. त्यांचा कसदार अभिनय, हा तमाशा कलाप्रेमींना परिचित असून, संपूर्ण जगातील मराठी भाषिक रसिकांच्या स्मरणात राहिलेला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तमाशा रसिकांवर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे.
नेटके यांनी अनेक तमाशांमध्ये, वगनाट्यातील खलनायकाच्या भूमिका सादर केल्या होत्या. तमाशा रसिकांवर अधिराज्य निर्माण करणारा युवा खलनायक व तडफदार भूमिका सादर करणारा कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. तमाशा क्षेत्रात प्रत्येक फडात आपले स्वतःचे अस्तित्व त्यांनी निर्माण केलेले होते.

तर पेठ च्या मातंग कलाकारांमध्ये हलगी, सनई, डफ, ढोलकी, ताशा इत्यादी अनेक कला पिढीजातपणे चालू असल्याने, त्या वारशामुळेच ते तमाशा फडामध्ये कधी कधी हलगी देखील खूप हातखंड्याने वाजवत असत.

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रातील नागरिकांना बसत आहे. या व्हायरसचा संसर्ग होऊन अनेकांचा जीव जात असताना आता कलाकार सुद्धा बळी पडत आहेत. अवघ्या महाराष्ट्रात गाव खेड्यात यात्रा-जत्रांमधून मनोरंजनाच्या माध्यमातून खलनायक अशी ओळख मिळवणारा एक तमाशा कलावंत आज कोरोनाचा बळी ठरलेला आहे.

आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या या मातंग समाजाला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न व इतर समारंभ होत नसल्याने, अशा वाजंत्री कलावंत मंडळींना, बेंजो पार्टी, ऑर्केस्ट्रा व तमाशा फड बंद असल्याने अक्षरशः उपासमार होत असल्याचे भयावह वास्तव समोर आहे.
त्यामुळे अशा लोककलावंतांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, समाजातून अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू केलेला असून, आज दिवंगत झालेल्या सुप्रसिद्ध वगसाम्राट दत्ता नेटके यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत मिळावि, अशी मागणी त्यांच्या पत्नी संध्या नेटके, संतोष नेटके व नेटके परिवाराकडून आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून केलेली आहे.

मातंग समाजाला प्राचीन काळापासून कलेची परंपरा लाभलेला इतिहास प्रचलीत आहे. विशेषतः अनेक राजांच्या राजवटीत, मनोरंजन व शास्त्रीय वादनाचे काम हा समाज इमाने इतबारे करत होता. त्यातल्या त्यात पूर्वी शास्त्रीय वादन कलेत पारंगत असलेला हा समाज, पुढे पुढे कलेचे महत्व कमी होत गेल्याने, अनेक चढ उतरांमुळे आर्थिक दृष्ट्या खालावत गेला. आर्थिक सुबत्ता असलेला मातंग समाजावर पुढे पुढे वाईट दिवस येत गेले. आज या मातंग समाजातील लोक कलावंतांना, उपासमारीचे दिवस आलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात कोरोना सारख्या संसर्गजन्य म्हणजेच साथीच्या रोगाच्या जागतिक महामारीमूळे, संपूर्ण कलावंत व विशेषतः वादनात कलावंत असलेला मातंग समाज, आजच्या परिस्थितीत मेटाकुटीला आलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत अशा कलावंतांची उपासमार होत असतानाच, एक सुप्रसिद्ध तमाशा कलावंत दत्ता नेटके पथके हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. अनेक तमाशा कलावंत, फडमालक, कलावंत संघटनांनी अशा सुप्रसिद्ध तमाशा कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून, आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून शासनाजवळ मागणी केली आहे की, आधीच आर्थिक संकटाने त्रस्त असणाऱ्या या कलावंताला आर्थिक मदत मिळावी.

दत्ता नेटके ज्या पेठ गावचे होते, तेथे खूप मोठी लोक कलावंतांची परंपरा आहे. प्राचीन काळात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये लहान लहान तमाशाचे फड होते. इसवी सन सत्तर – ऐंशीच्या दशकात पेठ याही गावात, कै. किसन गेनू नेटके तसेच दौलत गणपत नेटके यांचाही छोटासा तमाशा फड होता, अशी माहिती प्रसिद्ध हलगी वादक संतोष काळूराम नेटके यांनी सांगितले.
याशिवाय, पेठ येथील अनेक लोककलावंत सुप्रसिद्ध आहेत. त्यात सुप्रसिद्ध सनई वादक कै. काळूराम गणपत नेटके, सुप्रसिद्ध हलगी वादक वामन किसन नेटके, त्याचप्रमाणे आज दिवंगत झालेले वगसाम्राट दत्ता नेटके यांचे बंधू हलगीपटू भीमसेन नेटके व धूम वादक हनुमंत नेटके तसेच संध्या दत्ता नेटके, वगसम्राट पोपट नेटके आदी कलावंत सुप्रसिद्ध आहेत.

कोरोनाच्या महामारीत अशा अनेक गरीब कलावंतांना खरोखरच किराणा, अन्नधान्य व आर्थिक मदतिची आवश्यकता असल्याने, शासन, प्रशासन, कारखानदार व दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज दत्ताभाऊ नेटके पेठकर यांना असल्याचे, पेठ येथील त्यांच्या नेटके परिवाराने सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *