पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा कोटा वाढवून द्या, व्हेंटिलेटरचा वेळत पुरवठा करा; आमदार लक्ष्मण जगताप यांचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १५ एप्रिल २०३२१
कोरोना रुग्णांची दररोज झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा. तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या व्हेंटिलेटरचा वेळेत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दररोज सर्वाधिक वाढ होत आहे. जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. या दोन्ही शहर कोरोना चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबरच दोन्ही महापालिकांच्या मार्फत कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक करण्याची गरज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात सर्व वस्त्या व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या लसीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा. त्याबाबत आपण संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत.

तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रूग्णालयांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरचा वेळेत पुरवठा व्हावा यासाठी संबंधित यंत्रणेला आपण आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”