रविदादा ढमढेरे मित्र परिवाराच्या वतीने तमाशा कलावंतांना लाख मोलाची मदत

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

रविदादा ढमढेरे मित्र परिवाराने तमाशा कलावंतांना लाख मोलाची मदत देऊन, पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची परंपरा जपलेली दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे अडचणीत असलेल्या तमाशा कलावंत यांच्याकरिता, रविदादा ढमढेरे मित्र परिवार व गिरीप्रेमी ग्रुप सदस्य यांनी स्वेच्छेने, रू १०१०००/- (एक लाख एक हजार रु.) मदतनिधी जमा केला. तळेगाव ढमढेरे या ठिकाणी तमाशा सम्राट रघुवीर खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडे हा जमा झालेला निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी विकास रूणवाल महाराज यांच्याकडून प्राप्त झालेल्या दीड लाख रुपये किमतीच्या औषधांचे (सांधेदुखी तेल व बाम) वाटप करण्यात आले.

  

या प्रसंगी रवींद्र ढमढेरे, उद्योजक प्रमोद आप्पा देशमुख, पै. साईनाथ गव्हाणे, दीपक साकोरे, दिलीप ढमढेरे, किसन दमामे, रमेश बांडे, रवींद्र शिवले आदी मान्यवर उपस्थित होते.
तर निधी स्वीकारण्यासाठी तमाशा सम्राट रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत मोहित नारायणगावकर (राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई यांचे नातू), रघुवीर खेडकर यांचे मॅनेजर शफिभाई, गणेश गायकवाड आदी कलावंत उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना रमेश बांडे यांनी रविदादा मित्र परिवाराने तमाशा कलावंतांसाठी हा निधी स्वेच्छेने जमा केल्याचे सांगून या मित्र परिवाराची सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा खूप मोठी असल्याचे सांगितले. अनेक अडचणी व संकटाच्या वेळी धावून जाण्याचे काम हे ग्रुप करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तमाशा कलावंत हे गावोगावच्या जत्रा यात्रांची आपल्या कार्यक्रमांनी शोभा वाढवतात. स्वतःला झालेले दुःख काळजात दडवून कलावंत स्टेजवर आपली कला सादर करतात. हे करताना आपल्या काळजातील दुःख चेहऱ्यावर दिसू देत नाहीत, परंतु समाजाचे मनोरंजन मात्र करत राहतात. अशा लोक कलावंतांना राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला तरच लोककला जिवंत राहते. आज त्या कलावंतांवर हालाखीची परिस्थिती आली आहे. त्यांना ही छोटीशी मदत ग्रुपच्या वतीने देत आहोत असे सांगत, जमा होणारा निधी हा गरजू कलावंतांपर्यंत पोहचवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपले मनोगत व्यक्त करताना रविदादा यांनी सर्व मित्र परिवाराचे सढळ हस्ते मदतनिधी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. प्रत्येक वेळी हे मित्र मदतीसाठी पुढे येतात याचा मनस्वी अभिमान असल्याचे सांगितले. मित्रमंडळींनी यापूर्वीही उभारलेल्या मदतनिधी व केलेल्या सहाय्याबाबत माहिती दिली. लहानपणी तमाशा पाहतानाच्या आठवणी त्यांनी जागवल्या. योग्य कामासाठी ही मदत खर्च होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मदतनिधी व सत्काराला उत्तर देताना तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी सर्व मदतदात्यांचे मनापासून आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना आजारामुळे तमाशा कलावंतांवर खूप हलाखीची परिस्थिती ओढवलेली आहे. मिळेल ते काम करून कलावंत दिवस ढकलत आहेत. अशा प्रसंगी मदतीची खूप गरज होती. कलावंतांचा प्रश्न शासनाला समजावा यासाठी मंगला बनसोडे यांच्यासह एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली होती. आणि त्या मुलाखती नंतर राजाश्रयपेक्षा मोठा लोकाश्रय मिळाला. हजारो हात मदतीला पुढे आले. मराठी माणूस तमाशा विसरला नाही हे यावेळी स्पष्ट झाले. मोठी मदत मिळू लागली व कलावंतांना जगण्याचे बळ मिळू लागले. यातून सरकारने बोध घेऊन कलावंतांच्या पाठीशी राजाश्रय उभा करावा ही अपेक्षा देखील त्यांनी समस्त तमाशा कलावंतांच्या वतीने व्यक्त केली.

या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश बांडे यांनी केले. तर दीपक साकोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सर्व समाज सावरून निघावा हीच आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून प्रार्थना.

शब्दांकन – रमेश बांडे (रविदादा ढमढेरे मित्र परिवार व
गिरीप्रेमी ग्रुप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *