शिरूर तालुक्यातील कारेगाव MIDC मध्ये, बोगस डॉक्टरने मोठे हॉस्पिटल थाटून, तब्बल दोन तीन वर्षे लोकांना फसविण्याचा प्रकार उघडकीस आलाय. या बोगस डॉक्टरने चक्क MBBS च्या खोट्या सर्टिफिकेटद्वारे, कारेगाव येथे *”श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल”* स्थापले होते. शिवाय, यात ICU विभागही सुरू केलेला होता. मात्र, प्रशासनाला या बोगस डॉक्टर व त्याच्या बोगस मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलची, काडीचीही खबर नव्हती हे एक आश्चर्यच समजावे लागेल.
हा बोगस डॉक्टर केवळ ८ वि शिकलेला असून, त्याचे खरे नाव महेमुद फारुख शेख असे आहे. तो मूळचा पीर बुऱ्हाणनगर, तालुका व जिल्हा नांदेड येथील असल्याचे सांगत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा इयत्ता ८ वि शिकलेला डॉक्टर, पूर्वी नंदुरबार येथील डॉ. पाडवी यांच्याकडे कामाला असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, तो काही दिवसांनी पुणे जिल्ह्यातील, शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे काम शोधत आला होता. दरम्यानच्या काळात त्याने कारेगाव रांजणगाव MIDC येथील आर्थिक सुबत्तेमुळे, आपला तळ येथेच ठोकण्याचे ठरविले. तो काही दिवस रांजणगाव येथील एका नामांकित व नव्यानेच सुरू झालेल्या एका मोठया हॉस्पिटल मध्ये, डॉक्टर म्हणून कामाला राहिला. परंतु तेथे त्याचे काम चांगले नसल्याने, त्याला कामावरून काढून टाकल्याचे या हॉस्पिटल च्या मालक असणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगीतलेय.
त्यानंतर त्याने कारेगाव रांजणगाव पोलीस स्टेशनच्या समोरील पुणे नगर हाय वे च्या दुसऱ्या बाजूस, नव्यानेच बांधकाम सुरू असलेल्या एका नामांकित व्यक्तीच्या बिल्डिंगमध्ये, आपले बोगस हॉस्पिटल सुरू करण्याचा निच्छय केला. त्यासाठी त्याला पैशांची नित्तांत आवश्यकता होती.
तसेच, त्याला आवश्यक असलेले वैद्यकीय शिक्षणाचे डिग्री सर्टिफिकेट, त्याने बोगस रित्या आधीच इंटरनेटच्या साहाय्याने, डाऊन लोड करून मिळविले होते, अशी माहिती आता समोर येते आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मिळविलेल्या याच बोगस डिग्रीच्या आधारे त्याने, कारेगाव येथील पुणे नगर हायवे वरील, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये आपले स्वः मालकीचे हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या पैशांसाठी, त्याने नंदुरबार येथील आपले जुने मित्र डॉ. पाडवी यांना पैसे देण्याची गळ घातली. तसेच दोघांनी पार्टनर शिप करण्याचेही ठरविले. त्यामुळे डॉ. पाडवींनी, या बोगस डॉक्टर महाशयांना २०१८ मध्ये, आवश्यक असंणारी १७.५० लाख रुपयांची मोठ्ठी रक्कम दिलीही.
आणि त्यामुळेच कारेगाव येथे ICU युक्त असे मोठ्ठे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये, संपूर्ण दुसऱ्या मजल्याचा ताबा घेत सुरू केले. तसेच, या हॉस्पिटलमध्ये लागणारा प्रशिक्षित स्टाफ देखील त्याने भरला. त्यात काही शिकाऊ व अनुभवी डॉक्टर्स व नर्सेस चा समावेश आहे.
परंतु हॉस्पिटल सुरू केल्यानंतर काही दिवसांतच, कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे त्याने शक्कल लढवून, येथे कोव्हीडच्या रुग्णांचे उपचार सुरू केले. आणि बघता बघता त्याचा भरभराट होवू लागला. कारेगाव सारख्या MIDC भागात व पुणे नगर हाय – वे लगत असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये, रुग्णांचा ओढा वाढत गेला.
परंतु त्याच काळात या बोगस डॉक्टरने, पुन्हा एकदा आपला दुसरा डॉक्टर मित्र, डॉ. वळवी यांच्याकडे काही लाखांची मदत मागितली.
परंतु या वळवींनी, डॉ. पाडविंशी संपर्क साधत, हा महेमुद शेख शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील आपल्या हॉस्पिटल साठी पैशांची मदत मागत असल्याचे सांगितले. आणि त्यामुळेच या महेमुद शेख उर्फ डॉ. महेश पाटीलचे बिंग फुटले.
या दोन्ही डॉक्टरांनी, तात्काळ रांजणगाव येथील एक सुप्रसिद्ध डॉक्टर, की ज्यांच्याकडे हा मुन्नाभाई MBBS काही दिवस कामाला होता, त्यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महेश पाटील नावाने त्यांच्याकडे कामाला असलेल्या डॉक्टरचे काम त्यांना समाधानकारक न वाटल्याने, त्याला काही महिन्यांतच कामावरून काढून टाकल्याचे, पाडवी व वळवी या दोन डॉक्टरांना सांगितले.
परंतु, आपले पैसे परत घेण्यासाठी व पार्टनरशिपचा हिशोब घेण्यासाठी, दि. १० एप्रिल २०२१ रोजी डॉ. पाडवी हे थेट कारेगाव येथे समक्ष आले होते. येथे आल्यावर डॉ. पाडवी यांनी या महेमुद शेख कडे, त्यांनी दिलेल्या १७.५० लाख रु. व त्यांच्या ठरलेल्या भागीदारीच्या हिशोबाप्रमाणे पैशांची मागणी केली. परंतु हिशोब मान्य न झाल्याने, नंदुरबारचे डॉ. पाडवी व बोगस डॉक्टर शेख, या दोघांमध्ये भांडणे झाल्याने, डॉ. पाडवी यांनी रांजणगाव – कारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. आणि त्या चौकशीतच, या बोगस मुन्नाभाई MBBS डॉक्टरचे बिंग फुटून, सगळेच सत्य बाहेर आले.
यालाच म्हणतात “तेलही गेले, आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे”
या कारवाईवेळी तहसीलदार श्रीमती लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तसेच रांजणगाव कारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक शिंदे व शुभांगी कुटे, तसेच महसूल, पोलीस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व प्रकाराबाबत, या बोगस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांची कशी फसवणूक झालीय, याबाबत थेट त्यांच्या नातेवाइकांकडून आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी समक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, त्यांना या बोगस डॉक्टरने आर्थिक दृष्ट्या फसविल्याने, पोलिसांत तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याच प्रमाणे आमची आर्थिक जी फसवणूक झालीय, ती परत देण्याची विनंती मागणी या लोकांनी, मीडिया च्या माध्यमातून शासनाला केली आहे.
दरम्यान, रविवार दि. ११ एप्रिल २०२१ च्या रात्री, या बोगस डॉक्टर ला कुणकुण लागली, की डॉ. पाडवी यांच्या तक्रारीनुसार, पोलीस आपल्याला पकडू शकतात. त्यामुळे, त्याने त्याच रात्री आपल्या स्टाफला खोटे सांगितले, की माझा कोव्हिड रिपोर्ट हा पॉझीटिव्ह आला असून, मी काही दिवस गावाकडे आरामाला चाललो आहे. त्यानुसार तो कारेगाव येथून सटकण्यात यशस्वीही झाला. परंतु, पुणे LCB टीम ने त्याच्या मोबाईल लोकेशन व इतर माहितीवरून दौंड जवळ शिताफीने अटक केली.
परंतु या बोगस डॉक्टरने, अनेकांना कोट्यावधींना चुना लावल्याचे आता निष्पन्न होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बोगस डॉक्टरने कित्येक कोटींची माया जमवलेली आहे. कारण, २०१८ पासून त्याने हजारो रुग्णांवर उपचार केलेत. तर आज दि. १२ एप्रिल २०२१ रोजी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना अनेक किव्हिड रुग्णांच्या घरच्यांनी सांगीतलेय की, या बोगस डॉक्टरने प्रत्येक पेशंटचे दोन ते तीन लाख रुपये एवढे भरमसाठ बिल घेतलेले आहे. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्रॉपर्टी विकल्यात, तर काहींनी गहाण ठेवल्यात, तर काहींनी कर्ज काढलेय. अशा लोकांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच, अनेकांनी आता तक्रारी देण्यासाठी पोलिस स्टेशनचा मार्ग धरल्याचे दिसते आहे.
या बोगस डॉक्टरला, पोलिसांच्या पुणे LCB टीमने अटक केल्यानंतर, सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ रोजी उशिरा पर्यंत, या बोगस डॉक्टरच्या कारेगाव येथील श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची तपासणी व या बोगस हॉस्पिटल मधील ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याचे काम, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, महसूल विभागाच्या वतीने, शिरुरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख हे करत होते. यावेळी शिरूर तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी व त्यांचे कर्मचारी हजर होते. सर्व रुग्णांना उपचारासाठी, इतरत्र योग्य ठिकाणी हलविल्यानंतर या हॉस्पिटलला सील करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे समजतेय. आता या बोगस हॉस्पिटलमध्ये असणारी रुग्णांची कागदपत्रे, बिले व इतरही पुरावे शोधून सर्वसामान्य रुग्णांची झालेली आर्थिक, शारीरिक व मानसिक अशी न भरून निघणारी हानी, याचा सखोल शोध घेण्याची जबाबदारी आता महसूल, आरोग्य व ग्रह विभागावर आहे.आता शासन पुढे काय करतेय हे तर दिसेलच. परंतु, खऱ्या अर्थाने यातून अनेक प्रश्न आता समोर येत आहेत की,
१) इतके वर्ष कारेगाव सारख्या गजबजलेल्या ठिकाणी व पुणे नगर हमरस्त्यावर राजरोसपणे एक मल्टि स्पेशालिटी व ICU हॉस्पिटल सुरू असल्याचे, संबंधित वैद्यकीय विभागाच्या निदर्शसणास का आले नाही ?
२) इतके मोठे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल तब्बल २ ते ३ वर्ष सुरू होते, मग त्याच्या वार्षिक तपासणीची पद्धत शासनाच्या नियमांत नाही का ?
३) जर कोव्हिड चे रुग्ण या बोगस हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत, तर त्यांना शासनाकडून जी औषधे पुरविली जातात, त्यावेळी या बोगस हॉस्पिटलच्या औषध मागणी वेळी संबंधित यंत्रणेला कळाले नाही का ?
४) आजकाल सर्व ऑनलाइन असताना, या बोगस हॉस्पिटलच्या नोंदणीचा थांगपत्ता संबंधित यंत्रणेला नव्हता का ?
५) इतके वर्ष हे बोगस हॉस्पिटल सुरू होते, याला कुणा वजनदार किंवा राजकीय व्यक्तीचा वरदहस्त तर नव्हता ना ?
६) जर हे बोगस हॉस्पिटल इतके वर्ष सुरू होते, तर यात काही लोकांना व अधिकाऱ्यांना हप्ते तर चालू नव्हते ना ?
७) फिर्यादी डॉक्टरने जर या बोगस डॉक्टरला, या हॉस्पिटलच्या भागीदारीसाठी पैसे दिल्याची पोलिसांत तक्रार दिली असेल, तर यात फिर्यादी डॉक्टर देखील दोषी नाही का ?
८) जर महेश पाटील या डॉक्टरच्या नावाचे हा बोगस डॉक्टर सर्टिफिकेट वापरत असेल, तर असा कुणी महेश पाटील नावाच्या डॉक्टरचा तर यात आर्थिक हितसंबंध व हात नाही ना ?
अशा अनेक शंका, कुशंका व प्रश्न आता उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. व तशी चर्चाही लोकांमध्ये सुरू आहे.
त्यामुळे, आता नक्की आहे की येत्या काही दिवसांत, या प्रकरणाच्या चौकशीत अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना, कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल डोकेदुखी होऊ शकते व घरी बसण्याची वेळही येऊ शकते.
कारण, हा प्रश्न केवळ लोकांच्या आर्थिक भुर्दंडाबाबतचा नसून, सरळ त्यांच्या जीवाशी खेळला गेलेला असल्यानेच, या प्रकरणाची उच्यस्तरीय चौकशी होऊन, याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः लक्ष घालण्याची विनंती, येथे उपचार घेत असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक व येथे फसवणूक झालेल्या अनेक रुग्णांच्या घरच्यांनी केली आहे.
तर काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी, थेट महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे जेष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजतेय.
त्यामुळे, या मुद्यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळेच जर आता काही दिवसांत अशा फसवणूक झालेल्या रुग्णांच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या, तर आश्चर्य वाटायला नको.