पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची महापालिका आयुक्तांना सूचना

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १० एप्रिल २०२१
कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी समाजातील वंचित घटकांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. ही मदत संबंधितांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवून राज्यातील आर्थिक दुर्बल नागरिकांना सरकारमार्फत आर्थिक मदत करण्यात यावी, अशीही मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “गेल्या वर्षीप्रमाणे सद्यःपरिस्थितीत सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून राज्यात संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या काळात शहरातील रिक्षाचालक, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे चालक यांसारख्या समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

समाजातील हा घटक हातावर पोट असणारा आहे. रोज काम केले तरच त्यांच्या घरातील चूल पेटते, हे वास्तव आहे. परंतु, लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे समाजातील या घटकांचे हाताचे काम गेले आहे. पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणाऱ्यां लोकांचे संपूर्ण व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीच्या काळात शहरातील मानसिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला महापालिकेमार्फत दहा हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी. जेणेकरून लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय उध्वस्त होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील वर्गाला दिलासा मिळेल. महापालिकेमार्फत देण्यात येणारी आर्थिक मदत संबंधितांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”

तसेच यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन ईमेल केले आहे. राज्य सरकारने सुद्धा राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. ही मदत संबंधित कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *