दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांच्या रूपाने, अखेर आंबेगावलाच मिळाली गृहमंत्री पदाची मोठी संधी…

(रवींद्र पं खुडे, विभागीय संपादक, आपला आवाज न्यूज नेटवर्क, शिरूर)

दिलीप वळसे पाटील हे खरे तर आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी त्यांचा पक्षात नावलौकिक आहे. शिवाय आतापर्यंततरी वाद व टिकेपासून ते दूर राहिलेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच, दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा विनिमय करून घेतला आहे.


दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असा सूर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी लावलेला होता. त्यामुळेच, अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दिलीप वळसे पाटील यांनी आत्तापर्यंत महत्वाची खाती सांभाळत त्या खात्यांचा नावलौकिक वाढविलेला होता. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात देखील अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. आणि सर्वानुमते त्यांच्या नावावर मुंबई येथे झालेल्या बैठकीत आज निर्णय झाला.


राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी अनेक नेत्यांच्या, आधीच चाचपण्या पक्ष श्रेष्ठींमार्फत केल्या होत्या. परंतु शेवटी वळसे पाटील यांच्या नावावर, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दलचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या वादात अडकल्याने, त्यांनी आज सोमवार दि. ५ एप्रिल २०२१ रोजी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यात त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या गृहमंत्री पदावर जी आगपाखड चालू आहे, त्याची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. तसेच नव्याने गृह विभागाचा कार्यभार हा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार, हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात उल्लेख केला आहे.

दिलीप वळसे पाटील हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या निरगुडसर येथील. त्यांच्या वडीलांचे नाव कै. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील. त्यांनी देखील शरद पवार यांना भक्कमपणे साथ देत, आमदारकी भूषविलेली होती. त्याच काळात दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे, स्वीय्य सहाय्यक म्हणून कामाची संधी मिळाली होती. दिलीप वळसे पाटील यांच्या शांत, संयमी व अभ्यासूपणाची दखल शरद पवार यांनी घेत, थेट आंबेगाव विधान सभेची उमेदवारी दिलेली होती. वळसे पाटील या नावाचा नावलौकिक व वलय असल्याने, दिलीपराव हे प्रथमतःच भरघोस मतांनी निवडून आले होते. सलग सहाव्यांदा ते आंबेगाव विधानसभेचे आमदार असून, एक हुशार व संयमी नेता व शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना सतत महत्वाची मंत्रीपदे पक्षाने दिलेली होती. त्यामुळेच, आत्ताही त्यांचीच गृहमंत्री पदी वर्णी लागलेली आहे.

नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीवेळी, त्यांनी मंचर ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेशी युती करत, आंबेगाव तालुक्यातील मोठी व महत्वाची ग्राम पंचायत ताब्यात ठेवली होती. त्यामुळे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे जरी वळसे पाटील यांचे राजकीय शत्रू असले, तरी त्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी करत शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा युतीचा धर्म पाळत, सर्वांचाच विश्वास संपादन केलेला होता.
वळसे पाटील यांच्या बाबत असाहि अनेकांचा अनुभव आहे, की त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा माणूस आपल्या कामासाठी जर गेला, तर त्यांनी निःपक्षपातीपणे सर्वांनाच सहकार्य केलेले आहे. त्यामुळेच केवळ त्यांच्याच मतदार संघात नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या या वैशिष्ट्य पूर्ण कामाची ख्याती आहे.
सध्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाला शिरूर तालुक्यातील जी ३९ गावे जोडलेली आहेत, तेथील मतदारही त्यांच्यावर खुश असल्याने, या गावांनी सतत वळसे पाटील यांना भरघोस मते दिलेली आहेत. तसेच शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी वळसे पाटील यांनी सुसूत्रपणे मोर्चे बांधणी करत त्यांना निवडून आणलेले होते.

या सर्व बाबी वळसे पाटील यांच्या उजव्या ठरल्याने, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना गृहमंत्री पदाच्या अति महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपविलेली आहे.
दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी निवड झाल्यानंतर, शिरूर तालुक्यातील परंतु आंबेगाव विधान सभेला जोडलेल्या ३९ गावातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोव्हीडमुळे जल्लोष करता येत नसल्याने मात्र, सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेछ्यांचा अगदी वर्षाव केला असल्याचे दिसून आले.
या ३९ गावातील सर्वच मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी, तसेच माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरूर तालुक्यातील ३९ गावांचे आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, पंचायत समिती सभापती मोनिका नवनाथ हरगुडे, उपसभापती सविता प्रमोद पऱ्हाड, माजी सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती पै. सुभाष उमाप, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर भरघोस असा अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.
आपला आवाज न्यूज नेटवर्कलाही अनेकांनी मेसेज व फोन करत वळसे पाटील यांना शुभेच्छा पोचविल्या आहेत.
या ३९ गावांतील तमाम जनतेच्या वतीने व आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनेही, नामदार दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री पदाच्या अनंत शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *