शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी वकिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना दमबाजी, मानसिक व शारीरिक त्रास देत आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे निवेदन, शिरुरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना वकील संघटनेने दिलेले आहे. पोलीस निरीक्षकांच्या या कृत्याचा, घोडनदी (शिरूर) वकील संघटनेच्या वतीने, शिरूर पोलीस स्टेशन येथे जाहीर निषेध करण्यात आला. या अधिकाऱ्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी घोडनदी बार असोसिएशनच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
यावर प्रांताधिकारी देशमुख यांनी, आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना स्पष्ट केले की, संबंधित वकील बांधवांचे निवेदन हे माझ्या मार्फत जिल्हाधिकारी सो. ना पोच केले जाईल.
हे निवेदन गुरुवार दि १ एप्रिल २०२१ रोजी देण्यात आले, त्यावेळी सर्व वकील बांधव शिरूर पोलीस स्टेशन येथे जमून, निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश सचिव ऍड. शिरीष लोळगे, शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दिलिप गिरमकर, उपाध्यक्षा ऍड. सरिता खेडकर, राष्ट्रवादी लीगल सेलचे शहराध्यक्ष ऍड. रवींद्र खांडरे, ऍड. साहेबराव जाधव, ऍड. दिगंबर भंडारी, ऍड. संजय ढमढेरे, ऍड. राजेंद्र शितोळे, ऍड कांबळे, ऍड यमराज शिंदे, ऍड. सुहास लोखंडे, अक्षय पाचरणे, हर्षद भुजबळ, रोहित पोटावळे, प्रकाश भोगावडे, महेश रासकर, प्रदीप शितोळे, विक्रम पाचंगे, स्वप्निल माळवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिरूर शहर व तालुक्यातील वकील उपस्थित होते.
सविस्तर माहिती अशी की, घोडनदी बार असोसिएशन यांचे म्हणणे असे आहे की, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी, शिरूर वकील संघटनेचे सदस्य ऍड. मयूर शेळके यांनी, त्यांच्या पक्षकाराचे मिळकती संदर्भात कागदपत्र व कॅव्हेट, दोन पक्षकारांमध्ये वाद झाला म्हणून शिरूर पोलिस स्टेशन येथे गेले असता, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी, संबंधित वकिलांना या वाद मिळकतीविषयी अर्वाच्च भाषेत पक्षकारांसमोरच धमकावले. कागदपत्र न पाहता, संबंधित अशीलावर गुन्हा दाखल केला. त्यात वकिलांनाही आरोपी म्हणून सामील केले.
दुसऱ्या प्रकरणात, ऍड. सिद्धेश्वर नांद्रे यांचा वडिलोपार्जित वाद होता. यातही पोलिस निरीक्षक खानापूर यांनी या वकिलांना बळजबरीने पोलिस वाहनात बसऊन, धमकावून, शिरूर पोलिस स्टेशनला बेकायदेशीर डांबून ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला.
तिसऱ्या प्रकरणात, ऍड. येळे हे त्यांच्या निवासस्थानी चंदन नगर, पुणे येथे असताना, त्यांच्या गावी शिरसगाव काटा येथे दोन भावांमध्ये वाद होऊन मारामारी झाली असता, ऍड. येळे त्याठिकाणी नसतानाही त्यांचे नाव खोट्या गुन्ह्यात गुंतवून, त्यांच्या विरोधात भा द वि कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत, सर्व तक्रारी अर्जदार यांनी घोडनदी बार असोसिएशनला तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी, अधिकाराचा गैरवापर करून वकीलांबरोबर गैरवर्तन केले असून, संबंधित पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पदाचा गैरवापर करून वकिलांशी असभ्य वर्तन केले आहे व त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे, असे वकील संघटनेचे म्हणणे आहे.
त्यामुळेच खोटे गुन्हे दाखल करत, दमबाजी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध, घोडनदी बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
तसेच या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची, वरिष्ठांच्या मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश सचिव, ऍड शिरीष लोळगे यांनी केलीय.
प्रवीण खानापुरे यांनी शहरातील काही वकिलांवर खोटे गुन्हे दाखल करत, काहींना गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, अपमानास्पद वागणूक देणे, मानसिक त्रास देणे, असे कृत्य केले असून, या अधिकाऱ्याचा निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड दिलीप गिरमकर यांनी केली आहे.
दरम्यान, यावरही कळस म्हणून की काय, येथे ड्युटी वर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनिही या कायद्याच्या अभ्यासकांनाच दमदाटी केलीय. सविस्तर माहिती अशी की, शिरूर बार असोसिएशनचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षकांच्या विरुद्धचे निवेदन देण्यास शिरूर पोलीस स्टेशन येथे गेले असता, ठाणे अंमलदार ए एस आय, पठाण आई यु यांनी, हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व वकील बांधवांनी नाराजी व्यक्त करत, निवेदन स्वीकारण्याची विनंती करत तेथेच थांबले.
त्यावेळी, तेथे ठाणे अंमसलदारांना सहाय्यक रायटर महिला पोलिस कर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल शीतल गवळी यांनी वकिलांना उद्धटपणे बोलत व दमदाटी करत, “थांबा आता तुमच्यावर गुन्हेच दाखल करते” असे धमकावल्याचे व वकिलांशी असभ्यपणे बोलल्याने वकील बांधवांनी या घटनेचाही तीव्र निषेध करत, या महिला कर्मचाऱ्याच्या असभापणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निवेदन द्यायला गेलेले हे समस्त वकील बांधव, या महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे, राष्ट्रवादी लीगल सेलचे शिरूर शहराध्यक्ष ऍड रवींद्र खांडरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची, अशी ही उद्धटपणे बोलण्याची व धमकावण्याची, ही पहिलीच वेळ नसून, या आधीही अनेकांना उद्धटपणे बोलणे, रागावण्याचे व अपमानित करण्याचे प्रकार झाल्याच्या तक्रारी पत्रकारांकडे आल्या होत्या. या सर्व बाबी, वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनच्या तत्कालीन वरिष्ठांच्या कानावर घातलेल्या होत्या. परंतु वरिष्ठांनीही या बाबी मनावर घेतल्या नसल्यानेच, असे प्रकार फोफावत असल्याचे सामान्य नागरिकांचे म्हणणे असून, अशा प्रकारे जर कायद्याच्या जाणकारांनाच अशी पोलिसांकडून वागणूक मिळत असेल, तर याहून गंभीर व भयानक चित्र शिरूर पोलीस स्टेशनबाबत काय असू शकते ? याचीच चर्चा शिरूर शहर व तालुक्यात सध्या जोरदारपणे चालू आहे.
असे प्रकार केवळ सामान्य नागरिकांनाच सहन करावे लागत नाहीत तर, अशीच घटना एकदा खुद्द पत्रकारांबाबतच घडलेली आहे. “कामात अडथळा आणतोस का ? तुझ्यावर गुन्हाच दाखल करते”, अशी धमकी या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना दिलेली होती. परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक व काही जेष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीने यावर पडदा पडला होता.
त्यामुळे जर पत्रकार व वकिलांनाच अशा पद्धतीने धमकावले जात असेल, तर शिरूर पोलीस स्टेशनला येणाऱ्या सर्वसामान्य व सभ्य लोकांची काय अवस्था होत असेल ? हे यावरूनच स्पष्ट होतेय. अशा अनेक तक्रारी आहेत, की शिरुरला फिर्याद घेत नाहीत व योग्य वागणूक मिळत नाहीत म्हणून अनेक फिर्यादी, शेवटी कंटाळून पुण्याला एस पी ऑफिस किंवा दौंडला डी वाय एस पी ऑफिसलाच थेट जाताना आढळल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मते, शिरुरला पोलीस स्टेशन असून आणि नसून काहीच फायदा नाही. त्यामुळेच, येथे लवकरात लवकर डी वाय एस पी कार्यालय व्हावे, असे लोक बोलून दाखवत आहेत.
शिवाय येथील कामाची पद्धत देखील थोडीशी जगावेगळी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ते म्हणजे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, परवाच डी वाय एस पी, राहूल धस हे शिरूर पोलीस स्टेशनला व्हिजिट साठी आले असता, येथील पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी वर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, येथे जे लोक पोलीस स्टेशनला काही कामानिमित्त आलेले होते, त्या सर्वांनाच अक्षरशः हाकलून लावले. ही घटना काही पत्रकारांच्याच समोर चालू असल्याने, पत्रकारांनिही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
तसेच, जर वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनला व्हिजिटसाठी आले तर, येथील पोलीस निरीक्षक पत्रकारांनाही त्यांना भेटू देत नाहीत, उलट असे सांगितले जाते की, साहेबांना जरा घाई आहे व त्यांना तुम्ही आत्ता भेटू शकत नाहीत, अशा काहीतरी सबबी सांगत, उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अनुभव अनेक पत्रकारांना आलेले आहेत.
त्यामुळेच, अशा सर्व तक्रारींवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांनीच लक्ष घालावे व अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम जनतेतून व सुशिक्षित वर्गाकडून, आता जोर धरत आहे.
(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर)