जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त भक्ती शक्ती शिल्प येथे महापौर माई ढोरे यांचे अभिवादन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- दिनांक ३० मार्च २०२१ समाजातील अनागोंदी, भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्यासाठी तसेच समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून सजग समाज निर्मितीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी दिलेली शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक आणि मानवी जीवनाला उपकारक ठरत आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजनिमित्त संततुकारामनगर पिंपरी येथील त्यांच्या पुतळयास तसेच निगडी येथील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भक्ती शक्ती समूह शिल्पास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

संततुकारामनगर येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, संततुकाराम महाराज प्रतिष्ठानचे नंदु कदम, कुमार कोणकर, हरीभाऊ करमळकर, तात्या खाडे, किरण सुवर्णा, दिनानाथ जोशी, गुंफा खेडकर, अंजना सपकाळ, ह.भ.प. वसंत डोईफोडे आदी उपस्थित होते.

भक्ती शक्ती निगडी येथील झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ असून त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे असे नमूद करुन महापौर ढोरे म्हणाल्या, संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. त्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वसली आहे. या अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम महाराजांनी दिली. सामाजिक परिवर्तनासाठी जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडून समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगुनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या संत तुकोबारायांचे विचार सदैव प्रेरक राहतील असे महापौर ढोरे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *