महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य;सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची सायबर सेलकडे तक्रार…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी: दि २८ मार्च २०२१
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अवमानकारक उद्गार काढून तो व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रकाशित करणाऱ्या आप्पा हातनुरे या समाजकंटकावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत पुणे सायबर क्राइम ब्रँच चे पोलिस उपायुक्त यांना दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या “आप्पा हातनुरे” नामक विकृत व्यक्तीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतीशय घृणास्पद व्हिडिओ बनवून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय समाजात पसरलेल्या बर्‍याच वाईट गोष्टी दूर करण्यासाठी,तसेच वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. अस्पृश्य,महिला शिक्षण, विधवा-विवाह आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी महात्मा ज्योतिबांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तसेच अनेक सामाजिक आंदोलनाचे ते प्रणेते आहेत. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे.आप्पा हातनुरे याने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अशा आक्षेपार्ह उदगार काढून तो व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रकाशित केल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे अशा विकृत व्यक्तीला ताबडतोब अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच तो वादग्रस्त व्हिडिओ सोशल माध्यमांवरून हटविण्यात यावा, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.