रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि. २७ मार्च २०२१
पिंपरी चिंचवड शहरातून कोरोना विषाणू हद्दपार व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडीयमच्या जागेवरील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. पुन्हा कार्यान्वित होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरला आज दुपारी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करून कामाचा आढावा घेत रुग्णालय संबंधित कामे त्वरित पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या. शहरात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना ऑक्सीजन, आयसीयू बेडची आवश्यकता भासणार असून जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड- १९ रुग्णांवर उपचार होण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारी उपलब्ध करुन देत कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले. परंतु, गेल्या महिन्याभरात कोरोनाने डोकेवर काढले आहे, त्यामुळे शहरातील कोविड- १९ रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील रुग्णांना त्वरित ऑक्सिजन, आयसीयू बेड उपलब्ध होण्यासाठी जम्बो रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचा आज महापौर माई उर्फ उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी आढावा घेतला.