शिरूर तहसील कर्मचारी व दलालांना, वाळूचोरी प्रकरणी पोलिसांकडून अटक…

शिरूर, (विभागीय संपादक रवींद्र खुडे) 21 मार्च

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मार्च २०२१ रोजी मंडलाधिकारी शिरूर, यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक, क्रमांक एम एच १२ – आर एम ९९७०, हा शिरूर तालुक्यातील निमोणे गावाजवळ कुऱ्हाडवाडी परिसरात पकडलेला होता. त्याचा रीतसर पंचनामा करत, त्यात सहा ब्रास वाळू मिळून आलेली होती. सदर हायवा ट्रक पुढील कारवाईसाठी शिरूर तहसील कार्यालय येथे लावला होता. यासाठी हायवा ट्रक मालक विजय कोळपे याला तहसील कार्यालय यांच्याकडून, ४ लाख ४७ हजार ७७५ रुपये दंडाची नोटीस दिलेली होती. परंतु दिनांक १९ मार्च २०२१ रोजी रात्री पावणेबारा ते २० मार्च २०२१ रोजी पावणेएक च्या दरम्यान हा हायवा ट्रक, एम एच १२ – आर एम ९९७० चा मालक, विजय कोळपे याने शिरूर तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी गुंजाळ, नारायण डामसे व इतर दलालांना हाताशी धरून, आपआपसात संगनमत करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना मिळून आलेला हायवा ट्रक, एम एच १२, आर एम ९९७० महसूल विभागाचे कायद्याची रखवाली असताना, तो तहसील कार्यालयाचे गेटमधून बाहेर नेऊन त्यामध्ये असलेली अवैध वाळू, अंदाजे पाच ब्रास कोठेतरी टाकून देऊन किंवा लपवून, पुन्हा तो ट्रक तहसील कार्यालयाचे गेटच्या आत आणून पहिल्याच ठिकाणी लावला. हि सर्व घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेने हा गुन्हा उघडीस आला आहे. त्याबाबत, शिरूर चे तलाठी सर्फराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून, या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सहा जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली वाहने व वाळू चोरून नेऊन जेथे टाकली होती, तेथून वाळू जप्त केलेली आहे.
दरम्यान, यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.
नागरिकांच्या तक्रारींवरून, शिरूर तालुक्यातील काही पुढारी हे, शिरूर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच सरकारी कार्यालयांमध्ये, मोठ्या राजकीय नेत्यांशी त्यांची सलगी असल्याचे सांगत, स्वतःच्या आर्थिक व इतर फायद्यासाठी दलाली करत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत होत्या. अशा काही दलालांमुळे व त्यांच्या राजकीय ओळखीच्या दबावामुळे, सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये होत्या. या प्रकरणामुळे या गोष्टीवरचा पडदा उघडला गेला असून, आता सर्वसामान्य नागरिकांमधून जर आणखी काही तक्रारी पुढे आल्या, तर आश्चर्य वाटायला नको.
दरम्यान, या सर्व घडामोडींचा तपशील हा काही जागृत नागरिक व पत्रकारांना मिळाला होता. त्यामुळे या संबंधीच्या उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. काहींनी तर पूर्वीच वाळूसह भरलेल्या या गाड्यांचे फोटोही काढून ठेवलेले होते. शिवाय, महसूल खात्याच्या ताब्यात असणाऱ्या या गाड्या, रात्रीच्या वेळेस गेटच्या बाहेर जाऊन पुन्हा गेटच्या आत आल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच अशा तक्रारींमधून सी सी कॅमेरा फुटेज बघून, अशा रात्रीस खेळ चाले या घटनेवरील पडदा उघडला गेल्याने व या गुन्ह्यात सामील असलेल्या महसूल
कर्मच्याऱ्यांसह, दलाल व ट्रकमालक यांना अटक झाली असल्याने, नागरिकांमधून या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे.
शिरूर तहसील कार्यालय आवारात लावलेला हा ट्रक पळवून नेऊन व दंडाची रक्कम कमी करण्यासाठी या हायवा ट्रक मधील वाळू कमी करून, पुन्हा तहसील कार्यालय आवारात आणून लावल्या प्रकरणी तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी, एक राजकीय दलाल, हायवा मालक व त्याचे साथीदार अशा पुढील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. १) विजय धोंडीबा कोळपे (रा. निमोने, (कुऱ्हाडवाडी) ता. शिरूर जि. पुणे) २) सुरेश ठकाजी पाचर्णे (रा. तरडोबाचीवाडी, ता. शिरूर, जिल्हा पुणे), ३) संभाजी सुकलाल गुंजाळ (महसूल सहाय्यक), ४) नारायण गणपत डामसे (तहसील कार्यालय शिपाई), ५) संतोष अशोक गिरमकर (कुऱ्हाडवाडी, निमोणे, ता. शिरूर) ६) महेश गणपत अनुसे (निमोणे, ता. शिरूर, जी. पुणे) अशा सहा जणांना अटक केल्याची माहिती, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी प्रेसनोट द्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *