महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार मोफत महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड – दि २० मार्च
मध्यम व तीव्र कोविड -19 आजारी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर -१०० मिग्रॅ हे इंजेक्शन वापरले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन व औषधे मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
वाढती कोरोना रुग्ण संख्या त्यातच शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे अव्वाचे सव्वा दर परवडणारे नसल्यामुळे महापौर माई ढोरे यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचेही महापौर व पक्षनेते यांनी सांगितले.
राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध त्वरित मिळावे. तसेच डॉक्टरांनी हे इंजेक्शन लिहून दिल्यानंतर ते प्राप्त करून घेताना रुग्णांची / नातवाईकांची धावपळ होते. औषधांची किंमत जास्त असल्यामुळे जास्त रक्कम खर्च होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड -19 रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यासह शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून कोरोना संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वेगाने चाचण्या सुरू आहे. कोरोना रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असून विनाकारण नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, शहरातील वयोवर्षं 45 ते 60 या गटातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोना वाढू नये, याची सर्वस्तरावरून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *