नारायणगाव येथील डॉक्टर गोसावी यांच्या राहत्या घरामध्ये जबरी चोरी

सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल घेऊन वॉचमन फरार

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिक डॉक्टर एस जी गोसावी यांच्या राहत्या घरी जबरी चोरी करून हॉस्पिटल व निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकाने काही साथीदारांच्या मदतीने सुमारे १९ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवार दिनांक ११ रोजी सकाळी ८.३० ते शनिवार दिनांक १३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या घटनेची फिर्याद पवन सोपान गोसावी यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायणगाव येथील खोडद रस्त्याजवळ असलेल्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे सुरक्षारक्षक म्हणजेच वॉचमन म्हणून काम करणाऱ्या प्रकाश नेपाळी त्याची पत्नी पार्वती व दिनेश (पुर्ण नाव माहीत नाही) या सुरक्षारक्षकांनी हॉस्पिटलच्या वरच असलेल्या डॉक्टर गोसावी यांच्या राहत्या घरात मधून १९ लाख ७२ हजार रुपये किंमती चा ऐवज चोरून नेला आहे. या ऐवजा मध्ये लोखंडी तिजोरी सह रोख रक्कम दहा लाख ४२ हजार रुपये तसेच ९ लाख रुपयांचे सोन्याचे नेकलेस, गंठण, पाटल्या, राणीहार, कर्णफुले असे ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे ३० हजार रुपये किंमती ची चांदीची ताटे असा सुमारे १९ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा ऐवज व बँकेच्या ठेवीच्या पावत्या व इतर कागदपत्र चोरट्यांनी लांबवली आहे.
दरम्यान घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी भेट दिली असून घटनास्थळावर पोलिसांचे श्वानपथक व ठसे तज्ञांनी तपासकामी परिश्रम घेतले.
दरम्यान चोरटे चोरी करून फरार झाले असून त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३८१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *