कोरोनाचा सामना करताना सामूहिक सहभाग हवा- माई ढोरे महापौर…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १२ मार्च २०२१ – कोवीड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.  कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करुन सर्वांनी सहभाग नोंदवत आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
सांगवी येथील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोवीड-१९ लसीकरण केंद्रामध्ये महापौर माई ढोरे यांनी पती मनोहर शंकर ढोरे यांच्यासमवेत कोवीड-१९ ची प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.  कोवीड लसीकरणामुळे आपल्या आरोग्याचे संरक्षण होणार असून सर्व ६० वर्षे वयावरील ज्येष्ठांनी आणि ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजार असणा-यांनी कोवीड प्रतिबंधात्मक लस घ्यावी अशी प्रतिक्रीया महापौर माई ढोरे यांनी दिली.  
यावेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर आदी यावेळी उपस्थित होते. 
हात साबण आणि पाण्याने नियमितपणे स्वच्छ धुतले पाहिजेत, मास्कचा वापर केला पाहिजे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.  अशा सामान्य सवयी सर्वांना कोवीड-१९ च्या संक्रमणापासून सुरक्षित ठेवतील.  शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.  कोरोना विषयक नियमांचे पालन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.  शहरवासियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.
दरम्यान, पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनीदेखील कोरोना१९ प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे,ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.बाळासाहेब होडगर, डॉ. संगीता तिरुमणी आदी यावेळी उपस्थित होते.
           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *