नारायणगाव, (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवासी व राष्ट्रीय युथ आयकॉन २०२० या पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यकर्ते विशाल दिलीप भुजबळ यांची भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे, चक्रधरपूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाली आहे.
चक्रधरपुर हा दक्षिण पूर्व रेल्वे चा मोठा विभाग असून सदर विभाग हा खाण व्यवसायाने समृद्ध अशा झारखंडमधील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक समजला जातो. तसेच येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालाची वाहतूक करणारे रेल्वे मार्ग जातात. बऱ्याच वर्षापासून येथील रेल्वे संबंधी अनेक विषय प्रलंबित असून लोहमार्ग रुंदीकरण,भूसंपादन तसेच इतर अडचणींबाबत शासन दरबारी प्रयत्न करण्यास व सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत,या भूमिकेने विशाल भुजबळ काम करत आहेत.
याआधी सुद्धा परिक्षेत्रातील विविध रेल्वे प्रकल्पांकरिता भरीव निधी मिळावा यासाठी त्यांनी सतत सकारात्मक प्रयत्न करून अपेक्षित निधी खेचून आणला आहे. रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तक्रारी यांचे निवारण करणे कामी ते नेहमी अग्रेसर असतात. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व सदस्यांच्या धोरणात्मक बैठकांना उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत मांडणे, नवीन रेल्वे प्रकल्पाची मागणी करणे, रेल्वे प्रवाशांच्या सर्व सोयीसुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सदस्यांची असते.
गेल्या अनेक वर्षापासून भुजबळ हे रेल्वेसंबंधित कामे करत आहेत. यापुढे या समितीवर निवड झाल्याने अनेक प्रस्तावित कामे करण्यासाठी अधिकारवाणीने प्रयत्न करता येणार असल्याने, रेल्वे प्रवासी संघ व सामान्य नागरिकांनी भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे.
विशाल भुजबळ हे एनजीओ, सीएसआर माध्यमातून रेल्वेस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टेशनवरील प्रवाशांना सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तारासाठी योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. सर्व रेल्वेस्थानक हरित ऊर्जेने युक्त व्हावीत हा त्यांचा मानस आहे. स्वच्छ ,सुंदर व प्रवासी स्नेही स्टेशन या त्रिसूत्री नुसार काम करण्यावर आपला भर राहील,असे भुजबळ यांनी सांगितले.