शेतकरी नवरदेवाची ट्रॅक्टरवरून नवरीसह लग्नमंडपात अनोखी एन्ट्री

जुन्नर विभागीय संपादक रामदास सांगळे :-
ग्रामपंचायत कांदळी (ता.जुन्नर) या गावातील शेतकरी कुटुंबातील नवरदेव आकाश याने आपल्या लग्नात ट्रॅक्टरवरून वधूला घेऊन येत अनोखी एन्ट्री केली. याबाबतची माहिती अशी की ,१४ नंबर येथील दिगंबर कारभारी भोर यांचा मुलगा आकाश याचा विवाह रांजणी (ता. आंबेगाव) येथील बाळू वाघ यांची मुलगी आश्विनी हिजबरोबर १४ नंबर येथील राहत्या घरी पार पडला. भोर कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून आपल्या शेतीबरोबरच त्यांचा शेती मशागतीचा ट्रॅक्टर व्यवसाय आहे. विवाहासारख्या आनंदाच्या क्षणी आपल्या व्यवसायाला न विसरता वधूला लग्नमंडपात आकाश याने ट्रॅक्टर वरून आणले.ही आपल्या व्यवसायाशी असणारी एकनिष्ठता असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.आकाश याची इच्छा होती की, मला माझ्या होणाऱ्या पत्नीला लग्नमंडपात स्टेजवर माझ्यासोबत ट्रॅक्टर वर बसवून घेऊन जायचे आहे अशी संकल्पना त्याने मांडली व त्याचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य अनिल उर्फ बापू भोर व त्यांचे सहकारी यांनी केले. शेतकरी सुद्धा ठरवले की आपली इच्छा पूर्ण करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.या अनोख्या दमदार एन्ट्रीमुळे परिसरात या विवाहाची चांगलीच चर्चा होत आहे.