जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसतोड मुकादमांकडून ४७ लाखांची फसवणूक…सात जणांवर गुन्हा दाखल…

नारायणगाव, (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड टोळी मुकदमांनी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सात जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केलेले ऊसतोड मुकादम आरोपी भरत यशवंत राठोड (रा.पाळद, जिल्हा धुळे), तुकाराम जगन्नाथ सोनवणे (रा.गाळणे,ता.मालेगाव, जिल्हा नाशिक), मनिराम सोनू सोनवणे (रा.मुल्हेर,ता.सटाणा,जिल्हा नाशिक), प्रकाश यशवंत पाटील(रा.वाकडी,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव), दीपक सूर्यभान पवार (रा.मूळ डोंगरी,ता.नांदगाव,जिल्हा नाशिक), रोहिदास रघुनाथ आगे (रा.प्रिंपाळे वाखारी,ता.नांदगाव,जिल्हा नाशिक) आणि अजय वाल्मिक सोनवणे (रा.अंधारी हातगाव ता.चाळीसगाव,जिल्हा जळगाव) या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे सातही जण जुन्नर /आंबेगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊस तोड मजूर पुरविण्याचे काम करतात. त्यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर “नोटरी करार”केले होते. करारापोटी शेतकऱ्यांनी आरोपींना ४७ लाख २० हजार रुपयांची रक्कम दिली होती. मात्र आरोपींनी करार केल्याप्रमाणे ऊस तोडणीसाठी मजूर न पाठविता किंवा मजूर न देता, शेतकऱ्यांसोबत केलेल्या कराराचा भंग करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या वतीने किशोर सखाराम गाडगे (रा.कांदळी, ता.जुन्नर,जिल्हा पुणे) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *