रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि. ३ मार्च २०२१ :- शहरातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज ठेवा असा आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. शहरातील कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार घेताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची पूर्णतः खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या विशेष बैठकीमध्ये घेतला. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.
शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य आणि सहभागामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवू शकलो असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या, सध्या कोरोना रुग्ण संख्येमध्ये पुन्हा नव्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-१९ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नेमावी. कोरोना विषयक कामकाज करताना कोरोना बाधित होऊन मरण पावलेल्या मनपा कर्माचा-यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य तसेच अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती द्यावी, महागड्या रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महानगरपालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही महापौर ढोरे यांनी यावेळी दिले.
उपमहापौर घोळवे, पक्षनेते ढाके आणि नगरसदस्या डॉ. घोडेकर यांनीही यावेळी कोरोना रुग्णवाढ नियंत्रणासाठी प्रशासनाला विविध सूचना केल्या.
यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये २४ तास लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. मास्क न वापरणा-या तसेच कोरोना नियमांचे पालन न करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरातील कोरोना रुग्णवाढ होत असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालये देखील अधिग्रहित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोरोना कामकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, नागरिकांसाठी कॉल सेंटर देखील कार्यान्वित करण्यात आले आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. कोरोना उपाययोजने संदर्भात महापौर, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील संबंधित अधिका-यांना दिले.