रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि.१ मार्च २०२१- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोवीड-१९ लसीकरणाला महापालिकेच्यावतीने आजपासून सुरुवात झाली.
या लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामधून करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त राजेश पाटील, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता तिरुमणी, डाॅ.बाळासाहेब होडगर, डाॅ. करुणा साबळे आदी उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार साठ वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोवीड१९ लस दिली जाणार आहे. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वय वर्षे ४५ ते ६० या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींनाही कोवीड१९ ची लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आठ कोवीड१९ लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय चिंचवड यांचा समावेश आहे. या आठ ठिकाणी ही लस मोफत दिली जाणार आहे. शहरातील इतर ११ खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे, मात्र त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल.
ज्येष्ठ नागरिकांनी कोवीड१९ चे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले. लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करु नये तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.