रमणकाका माळवदकर संघर्षमय आयुष्याची सांगता…

नारायणगाव (किरण वाजगे)
उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ तसेच ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरांमध्ये अनेक व्यक्तिमत्व आपल्या आदर्श कर्तुत्वामुळे नावारूपास आली त्यातील एक व्यक्ती म्हणजे स्वर्गीय रमेश दत्तात्रय माळवदकर हे होत.
स्व. रमेश माळवदकर उर्फ रमणकाका हे बालपणीच्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे वय वर्षे ७४ पर्यंत खडतर, संघर्षमय आयुष्य व्यथित करणारे सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व होते. मनमिळावू, भोळा, विनम्र, सतत कार्यमग्न आणि पहिल्याच भेटीत सर्वांना आपलंसं करणारा स्वभाव ! याच स्वभावामुळे प्रचंड दांडगा अगदी घराघरात जिव्हाळ्याचा-आपुलकीचा संपर्क, सर्वांसोबत स्नेहाचे संबंध, प्रेम. बहीण भावंडापासून ते सर्व नातेवाईकांमध्ये-जनमाणसांत प्रसिद्ध, नारायणगावकरांच्या गळ्यातील ताईत म्हणजे सर्वांचे लाडके रमणकाका होत.
सुरुवातीपासूनच ज्येष्ठ बंधू कै. गजानन (भाऊ) माळवदकर यांच्या खांद्याला खांदा लावून भाऊंच्या सावलीसारखे त्यांच्या बरोबरीने रमणकाका उभे राहिले, बरोबरीने कष्ट केले. शेवट पर्यंत भाऊंचा शब्द हिच पूर्व दिशा मानून त्यांची अखंड सेवा केली. नारायणगावातील हनुमान चौक येथील ‘रमेश सुईंग मशीन‘ च्या माध्यमातून अखंडपणे शिवणकाम केले. त्याकाळात अगदी फोटोवरून कोट, जॅकेट, शर्ट-पँट तसेच ब्लाऊजचे काकांनी अनेक वर्षे शिवणकाम केले.
समाजसेवेची आवड जोपासताना, अनेकांची लग्ने जमवताना, अनेकांना नोकरी-धंद्याला जोडताना, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होताना अंतःकरणातून असलेली अध्यात्माची आवड सुद्धा काकांनी जोपासली. यामध्ये ‘हनुमान देवस्थान ट्रस्ट, हनुमान चौक‘ येथे कै. मुरलीधर (नाना) डेरे, श्री. बबन कानडे आणि तमाम सहकाऱ्यांच्या बरोबरीने तब्बल २५ वर्षे खजिनदार, उपाध्यक्ष ही पदे यशस्वीरित्या भूषविली. या माध्यमातून अतिशय चोख कारभाराद्वारे हनुमान देवस्थानची प्रामाणिकपणे, निस्पृहरित्या अखंड सेवा केली. तसेच ‘हरिस्वामी देवस्थान‘ च्या अगदी सुरुवातीच्या संस्थापक कमिटीमध्ये हिरीरीने संचालक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. उत्सवासाठी असणाऱ्या वर्गण्या असो वा देवस्थानच्या खोल्यांचे भाडे असो सर्व व्यवहार अगदी चोख पद्धतीने काकांनी पार पाडला. तसेच नारायणगाव पंचक्रोशीतील सर्वांची गुरुमाऊली परम पूजनीय अनंतघोष उर्फ मौनी बाबाजी हे रमणकाकांच्या गुरुस्थानी होते. त्याकाळात श्री. भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथे रमणकाका हे दिवाबत्ती करायला जात होते, तेव्हा त्याठिकाणी मौनी बाबाजी असताना बाबाजींना रमणकाका भजन ऐकून दाखवायचे. त्याचप्रमाणे तेव्हाच्या गावातील मंडळांच्या गणेशोत्सवात रमणकाकांचा आरती गायनात प्रामुख्याने सहभाग होता. हे सर्व सुरू असताना खऱ्या अर्थाने रमणकाकांच्या जीवनाला साथ मिळाली २ गोष्टींची. पहिली म्हणजे त्यांची पत्नी श्रीमती रजनी रमेश माळवदकर (वय ६८ वर्षे). खांद्याला खांदा लावून रमणकाकांची अखंड आयुष्यभर साथ दिली. संघर्षमय जीवनात मागे वळून न पाहता, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना, प्रत्येक संकटांना न हटता – न थांबता तोंड दिले.
जन्मतःच समाजसेवेची आवड असणाऱ्या रमणकाकांना दुसरी साथ मिळाली ती LIC ची. रमणकाकांनी चरितार्थाचे क्षेत्र सुद्धा असे निवडले की, ज्यामध्ये अहोरात्र, अखंडरुपी, खऱ्या अर्थाने समाज सेवा करता येईल. समाजसेवेरुपी हाती घेतलेल्या LIC एजंटच्या कार्यात रमणकाकांनी आपल्या आयुष्यातील सन १९८५ पासूनची आजतागायत तब्बल ३५ वर्षे अविरतपणे वाहिली. या सर्व कार्यात काकांना त्यांचे विकास अधिकारी शांताराम शेलार साहेब तसेच इतर विकास अधिकारी डी डी डोके साहेब, रघुनाथ काकडे साहेब व बाकी सर्व विकास अधिकारी, एजंट, आणि ऑफिस कर्मचाऱ्यांचे प्रचंड योगदान मिळाले. त्या काळात रमणकाका हे पहिल्या वहिल्या ५ एजंट पैकी एक होते. फक्त LIC एजंट असताना त्यांनी ३ मुलींची शिक्षणं, त्यांची लग्न तसेच मुलगा ओमकार याचे शिक्षण हे पार पाडले. मुलगा ओमकार याच्या भविष्यासाठी रमणकाकांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यांच्या कष्टामुळेच ओमकार हा आज एक यशस्वी उद्योजक असून त्याने गेल्या १५ वर्षांपासून ‘स्वरसंजीवन’ नावाचा स्वतःचा, उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिला अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओ यशस्वीपणे नावारुपास आणला आहे.
समाजसेवा, अध्यात्म, LIC चे कार्य सुरू असताना रमणकाकांनी तत्कालीन सरपंच व काकांचे परमस्नेही भीमराव खैरे, इरिगेशनचे श्री. जाधव साहेब तसेच के टी भोर यांच्या सहकार्याने खोडद रोड येथील बंधाऱ्याचे काम व अनेक रस्त्यांची कामे सुद्धा यशस्वीरित्या पार पाडली.
आयुष्यभर खडतर संघर्ष असताना सुद्धा नेहमी आनंदाची उधळण करणाऱ्या रमणकाकांचे ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, ३ मुली, १ मुलगा, सून आणि नातवंडे आहेत.
जी हृदयात राहत होती ती एक मूर्ती होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एक कीर्ती होती,
ती पवित्र मूर्ती म्हणजे ‘रमणकाका’..!
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने आप्त स्वकीय सारे पोरके झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना..!

“शून्यातून विश्व नमुनी, अमर जाहले जीवनी”
स्वर्गीय ‘रमणकाका माळवदकर’ या पुन्हा परतूनी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *