
रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि.२३ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड शहरात वाहने पार्कींगची वाढती समस्या लक्षात घेऊन महापालिकेने पार्किंग धोरण अवलंबविले आहे. या धोरणामध्ये शहरातील वाहन पार्कींग शिस्त लागणार असुन रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांना आळा बसणार आहे. सद्यस्थितीत शहराच्या सर्वच भागामध्ये विशेषत: मोठ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अवजड व व्यावसायिक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने दिवसेंदिवस उभी केलेली असतात. अशा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढुन त्यामुळे वाहतुकीसाठी नेहमी अडथळा निर्माण होत असतो. वास्तविक या ठिकाणी सर्वसामान्यांची वाहने नसुन ती सर्व मोठी व व्यावसायिकांचीच असतात. याबाबतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या वाहने पार्कींग संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पार्कींग धोरण लागु करण्याचा निर्णय घेणेत आलेला आहे. यामुळे यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही. परंतु शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची या धोरणामुळे पोटदुखी वाढली असुन हप्तेखोरी बंद होणार या कारणामुळे त्यांचा या धोरणाला विरोध सुरु झाला आहे. खरतर या पार्कींग धोरणामध्ये मुळात मोठ्या रस्त्यांवर अवजड व व्यावसायिक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने बिनदिक्कतपणे लावली जातात यात सर्वसमान्यांच्या गाड्या नसतात हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.
याउलट पार्कींग धोरण लागु केल्यामुळे शहरातील वाढती वाहतुकीची समस्या दुर होवुन अनाधिकृतपणे पार्कींग केलेल्या वाहनामध्ये घडणारी गैरकृत्ये बंद होवुन वाहतुक सुरळीत होवुन वाहनांना शिस्त लागणार आहे. शिवाय पार्कींग धोरणामुळे मनपाच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. परंतु राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांची हप्तेखोरी बंद होणार असल्याने पार्कींग धोरणाला विरोध करण्याचा केविलवाणा प्रकार राष्ट्रवादीकडुन केला जात असल्याचा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.