सेकंडरी शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – खा.डाॅ.अमोल कोल्हे

नारायणगाव येथे पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन कार्यालय आणि अतिथीगृहाचे उद्घाटन संपन्न

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
सेवेत असताना मृत्यू आल्यास मयत सभासदास पूर्ण कर्जमाफी देण्याचा सेकंडरी शिक्षक पतसंस्थेने घेतलेला निर्णय स्तुत्य असून पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असणारी सेकंडरी क्रेडिट सोसायटी शिक्षकांची एक आदर्श पतसंस्था आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारदार पतसंस्थेच्या नारायणगाव येथील स्वमालकीच्या नूतन कार्यालयाचे आणि शिक्षक पर्यटकांसाठी निर्माण केलेल्या अतिथिगृहाचे उद्घाटन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच नारायणगाव येथील व्हीजन गॅलेक्सी येथे करण्यात आले.


याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,राष्ट्रवादी युवा नेते अमित बेनके, ज्येष्ठ संचालक जगन्नाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे, गणेश वाजगे, संस्थेचे सचिव किशोर पाटील, सहसचिव शिवाजी शेंडगे,खजिनदार सुरेश संकपाळ, पालक संचालक सखाराम डोंगरे,गुलाबराव गवळे, सुधाकर जगदाळे, पांडुरंग कणसे, रामचंद्र गलांडे, सतिश शिंदे, सुरेखा माने,मेहबूब काझी, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे,भास्‍करराव पानसरे, सुनील ढवळे, राहुल नवले, संतोष ढोबळे, निलेश काशीद,महेंद्र बोराडे, अशोक काकडे,मारुती डोंगरे, बाबासाहेब जाधव,राजू आढळराव,अरविंद गवळे, तसेच जुन्नर,आंबेगाव,खेड, शिरूर तालुक्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी हजर होते.
सेकंडरी स्कूल सोसायटीने जुन्नर तालुक्याचे महत्त्व ओळखून महाराष्ट्रातील शिक्षक पर्यटकांसाठी सुंदर अतिथिगृह निर्माण केले आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख पाहून शिक्षकांच्या संघटित कार्याचा निश्चित अभिमान वाटतो आहे असेही खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील आपल्या संस्थेला पूर्ण सहकार्य दिले जाईल तसे शिक्षक-शिक्षकेतर ग्रामीण भागातील या सभासदांना आर्थिक समृद्ध करण्याचे काम संस्थेने करावे असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून राज्यभर २३ शाखा कार्यरत आहेत, संस्थेचे ३४ हजार सभासद असून एकूण एक हजार आठशे कोटींचा व्यवसाय आहे. संस्थेने १००० कोटींचे कर्जवाटप केले संस्थेकडे ६५० कोटी ठेवी असून सेवाकाळात मयत झालेल्या सभासदास आतापर्यंत आठ कोटी तीस लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी देणारी ही आदर्श संस्था आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा लाख आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी सात लाखांची मदत संस्थेने केली आहे.लोणावळा आणि नारायणगाव येथे संस्थेचेअतिथीगृह असून ८० टक्के शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव किशोर पाटील यांनी दिली.
यावेळी इयत्ता दहावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासद पाल्यांचा व त्यांच्या पालकांचा शैक्षणिक भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचे दिवंगत सभासद आणि उपक्रमशील शिक्षक स्वर्गीय सुनील भगवान वाव्हळ यांच्या कुटुंबियांना ३१ हजार रुपयांची रोख मदत देऊन संस्थेच्या जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांचे १८ लाख रुपये कर्ज माफ केल्याचे ज्येष्ठ संचालक जे.आर. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालक संचालक सखाराम डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन तबाजी वागदरे व मेहबूब काझी यांनी केले. संचालक सुधाकर जगदाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *