शिरूर – अनाथांची माई डॉ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री किताब मिळाल्याबद्दल शिरूरच्या विविध संस्था व संघटनांच्या वतीने सत्कार

(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)  
अवघ्या जगात अनाथांची माई म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अनेक अनाथांना सांभाळून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणाऱ्या डॉ सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारने, २६ जानेवारी २०२१ रोजी पद्मश्री हा बहुमान देऊन गौरविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूरकरांनीही त्यांचा यथायोग्य असा सन्मान केला.
निमित्त होते रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कुल येथे माईंच्या संस्थेतील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांची भेट व समाजातील दानशुरांनी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केलेला होता.   रोड वरील माईंच्या संस्थेत त्यांचा सत्कार केला.
त्यात तेजस्विनी फौंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण, सचिव उषा घरत, ज्योती शेलार, शुभांगी ढेम्बरे, मीनाक्षी दुन्डगे, सोनाली गारूडकर, लता खेडकर, शांता माने, मनीषा गदादे  आदी महिला उपस्थित होत्या.
तर जनविकास फौंडेशन सामाजिक संस्था, शिरूरचे तुषार वेताळ, अशोक गव्हाणे, संतोष साळी, स्मिता इसवे, साक्षी साळी, सुनील साळी, निलेश नवले, सचिन कळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी, संत रविदास महाराज जयंती उत्सव समिती, शिरूर च्या वतीने डॉ सिंधुताई सपकाळ यांना आदर्श माता सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिरूरच्या अध्यक्षा शारदा भुजबळ व तारा नारद यांच्याही वतीने माईंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘द मदर ग्लोबल फौंडेशन, पुणे’  संचलित ‘श्री मनःशांती छात्रालय, शिरूर’ या संस्थेचे व्यवस्थापक विनय सिंधुताई सपकाळ, शिरूर ग्रामीणचे ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, पत्रकार पोपट पाचंगे व रवींद्र खुडे उपस्थित होते.
दरम्यान रयत शाळेतील माईंच्या भाषणावेळी, व त्या स्वतःचा जो जीवनप्रवास सांगत होत्या, त्या बातमीच्या छायाचित्रणादरम्यान, आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्या डोळ्यात अखंडपणे अश्रू वाहत असल्याचे माईंच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते. त्याचाच धागा धरत, माईंनी रामलिंग रोड वरील  विद्यार्थी छात्रालायमधील कार्यक्रमावेळी, आवर्जून पत्रकार रविंद्र खुडे यांना आपल्या मायेच्या भाषेतून, “ये रडका पत्रकार इकडे ये” असे संबोधून खुडे यांचा कान पकडल्याने, उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला. त्यानंतर माईंनी छात्रालयातील जेवण करून, विदर्भाचा रस्ता पकडला व जातानाही उपस्थितांशी मायेने संवाद साधत, छात्रालयातील सर्व विद्यार्थी, स्टाफ तसेच स्वयंसेवकांना “काळजी घ्या रे बाबांनो माझ्या लेकरांची, तुम्हीच मायबाप आहात त्यांचे, मी एकटी नाही, तुमच्या मुळेच ही माई भक्कमपणे उभी आहे रे बाबांनो” अशा सूचना देत पुढील कार्यक्रमाकडे प्रस्थान केले.
आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने माईंच्या या अखंड सेवेसाठी शुभेच्छा व या निमित्ताने देशभरातील जनतेला आवाहन, की आपण अशा अनाथ व निराधार मुलांना मनात जरी इच्छा असली, तरीही सांभाळू शकत नाही. परंतु या संस्था विना अनुदानित असल्याने, या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी जर आपण घेतली व आपण स्वतः येथे येऊन या मुलांमध्ये आपले वाढदिवस साजरे केले, काही आवश्यक वस्तू देणग्या स्वरूपात दिल्या, तर आपल्या मनातील समाजसेवेची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी माईंच्या संस्थेची वेबसाइट द्वारे नक्कीच आपण सर्वचजण या देणग्या योग्य ठिकाणी पोचवू शकतो.
माईंच्या याच कार्याची दखल घेत, भारत सरकारने त्यांना जो “पद्मश्री” हा बहुमान दिलाय, तसे आपणही माईंच्या या कार्यासाठी देणगी देऊन त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *