पुणे :- (आंबेगाव ब्युरो मोसीन काठेवाडी )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे विभागाच्या सहसचिव पदी समर्थ भारत या वृत्तसमूहाचे संपादक डॉ. समीर पठाण यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. समीर पठाण हे एक बहुआयामी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि कुशल संघटक आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या बैठकीत राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य संघटक संजय भोकरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी पुणे विभागाच्या अध्यक्षपदी मावळते पुणे जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली. विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या कार्यकारिणीमध्ये सचिवपदी म्हणून ऍड. संजय माने, सहसचिवपदी डॉ. समीर पठाण, उपाध्यक्षपदी राजेंद्र कोरके, कार्याध्यक्षपदी गोविंद वाकडे, कोषाध्यक्षपदी बाजीराव फराटे, संपर्कप्रमुखपदी रोहित जाधव, संघटकपदी अतुल क्षीरसागर तर सल्लागार म्हणून सतीश सावंत आणि अल्ताफ पिरजादे यांचीही निवड करण्यात आली आहे.
डॉ. समीर पठाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात संघटनात्मक दृष्ट्या विखुरलेला पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने एकत्र आला. पत्रकाराने पत्रकारिता हाच धर्म मानून सामाजिक दायित्व पार पाडावे या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेगाव तालुक्यामध्ये तब्बल ५३ पत्रकार एकत्र आले. अशा प्रकारे काम करत त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची प्रचिती दिली.
या निवडीनंतर बोलताना पुणे विभागामध्ये येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आंबेगावच्या परंपरेप्रमाणेच सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत करून एकमेकांना सहकार्य करत पत्रकारितेचा धर्म जोपासणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सदर निवड म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान असून हे पद आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवाना समर्पित करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या निवडीच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी विभागाचे प्रदेश अध्यक्ष रणधीर कांबळे, मंत्रालय संपर्कप्रमुख नवनाथ जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवरा, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे, राकेश वाघमारे, जुन्नर तालुका अध्यक्ष राजवंश डोके, उपाध्यक्ष मंगेश रत्नाकर तथा राज्यभरातून आलेले पत्रकार बांधव तथा मान्यवर उपस्थित होते, यावेळी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांनी सूत्रसंचलन केले, तर राज्य संघटक संजय भोकरे यांनी आभार मानले.