सी. ए. परीक्षेत पुणे विभागातून प्रथम आलेल्या ऋतुजा घोलप चा सत्कार…

दि. ११ घोडेगाव : – आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी घेतलेल्या सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत पुणे केंद्रातून ऋतुजा घोलप ही प्रथम आल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव येथील प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे कौतुक करत सत्कार केला.
   फुलवडे ता. आंबेगाव येथील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक अविनाश घोलप यांची कन्या ऋतुजा घोलप हिने सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत ८०० पैकी ६१८ गुण मिळवून पुणे केंद्रात प्रथम क्रमांक संपादित केला. तिने आपल्या शिक्षणाची सुरुवात न्यू इंग्लिश मीडियम स्कुल घोडेगाव येथून केली. त्यानंतर तिने कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल येडगाव, ता. जुन्नर येथे एस. एस. सी. परीक्षेत ९७ टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) मध्ये शिक्षण घेऊन एच. एस. सी. परीक्षेत ९३ टक्के गुण संपादित केले. त्याचवेळी सी. ए. होण्याचे स्वप्न बाळगून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेऊन सी. ए. फाउंडेशन नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ४०० पैकी ३४६ गुण मिळवून भारतात १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यावेळी सी. ए. इंटरमिजिएट नोव्हेंबर २०२० मधील परीक्षेत तिने भारतात ५० वा क्रमांक तर पुणे केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असताना घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, विकास निरीक्षक विठ्ठल चव्हाण, राजाराम गाडेकर, शरद काळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *