महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे खेड्याकडे चला ही संकल्पना गरजेची – भास्करराव पेरे पाटील

नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक) दि.३०         

                           भारत हा कृषिप्रधान देश आहे. यामुळे महात्मा गांधींनी सांगितलेली खेड्याकडे चला हा संकल्पना सर्वांनीच आत्मसात करून  ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी  एकोप्याने प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) ग्रामपंचायत’ चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले.
नारायणगाव ग्रामपंचायत व समविचारी प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पेरे पाटील बोलत होते.
      या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे होते. प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी,हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी, खोडद, निमदरी, येडगाव, आर्वी, मांजरवाडी आणि उदापूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे, समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे, उपाध्यक्ष आशिष माळवदकर, सचिव राखी रत्नपारखी, हर्षल मुथ्था, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, उपसरपंच सारीका डेरे, आरीफ आतार, संतोष दांगट, संतोष पाटे,ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, माजी सरपंच ज्योती दिवटे, ग्रामपंचायत सदस्या आश्विनी ताजणे, सुप्रिया खैरे, रुपाली जाधव, मनिषा मेहेत्रे, पुष्पाताई आहेर, कुसुम शिरसाठ, संगीता खैरे, सदस्य गणेश पाटे, राजेश बाप्ते, रामदास अभंग, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते ईश्वर पाटे आणि कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     पेरे पाटील म्हणाले की,प्रत्येक खात्याची तपासणी झाली पाहिजे,तपासणी झाल्यास आढावा घेतल्यास,त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो. करण्यासारखं भरपूर काही आहे, मात्र इच्छाशक्ती पाहिजे असे सुरुवातीला सांगून, ते पूढे म्हणाले की, पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे, सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे, किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे. मुलांना योग्य शिक्षण दिले जावे. झाडे लावली पाहिजे, अनाथांना, निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे. माणसाचे आयुष्य का कमी झाले या विषयावर बोलतांना पेरे पाटील म्हणाले की, माणसाला मोकळा श्वास अर्थात ऑक्सिजन घेण्यासासाठी माणसाकडे वेळ नाही. सर्वत्र घुसमट निर्माण झाली आहे. जमीन आहे तितकीच आहे मात्र लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे झाडे लावण्याऐवजी तोडली जात आहेत. झाडे लावा झाडे जगवा. हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला. झाडे नसल्याने ऑक्सिजन कमी झाला आहे. झाडे असतील तर ऑक्सिजन वाढेल. पाटोदा या आमच्या गावात रस्त्याने लोकं नारळ तोडून खातात, झाडे लावा आणि त्यातही फळ झाडे लावा. आम्ही आमच्या गावात यंदा आणखी एक प्रयोग केला तो म्हणजे वेल (भोपळा,दोडके,कारले) असे भाजीपाल्याचे वेल लावले आहेत.
 ग्रामसेवक म्हणजे कपिला गाय आहे. त्यांच्याशी वाद घालून कामे करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेऊन कामे केली पाहिजेत.  काम करणारालाच नावे ठेवली जातात. परंतू लोकांची नाडी ओळखा आणि कामे करा. आम्ही तेच केले. तुम्हीही करा. असा संदेशही नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी दिला.
      पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर  यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविल्यामुळे ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले.
यावेळी राखी रत्नपारखी यांनी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर आणि हेमंत कोल्हे यांनी केले.आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *