बाल गिर्यारोहक साई कवडे व एव्हरेस्टविर कृष्णा ढोकले यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी, दि. २९ जानेवारी  २०२१ – युरोप मधील सर्वोच्च शिखर एलब्रुसवर चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज तेथे फडकविणारा ११ वर्षीय बाल गिर्यारोहक साई कवडे आणि भारतातील सर्वोच्च शिखर माऊंट कांचनजुंगा सर करणारे गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांचा सत्कार आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.


          महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या सत्कार समारंभास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या आरती चोंधे, झामाबाई बारणे, निर्मला कुटे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अंकुश कानडी, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे उप आयुक्त संदीप खोत, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

साहसी खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी साई कवडे आणि कृष्णा ढोकले या गिर्यारोहकांनी खडतर परिश्रम करून प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून शहराच्या नावलौकिकात भर घालणारे आहे.  उदयोन्मुख खेळाडूंनी यापासून प्रेरणा घेऊन शहराचे नाव अधिक उज्वल करावे असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या.