नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यात झालेल्या ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण निकाल लागले आहेत या सर्व ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले असून त्याखालोखाल शिवसेनेच्या सदस्यांनी बाजी मारली आहे.
धनगरवाडी येथील निवडणुकीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी उपसरपंच महेश जयवंत शेळके व त्यांच्या पत्नी प्रियांका महेश शेळके हे दोघेही पती-पत्नी निवडून आले आहेत.
अशाच प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण निकाल या निवडणुकीमध्ये लागले आहेत. यामध्ये बस्ती याठिकाणी दोन महिला उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. यामध्ये अनिता गोरडे यांचा विजय झाला असून काही पत्रकार देखील या निवडणुकीमध्ये विजय झाले आहेत. त्यामध्ये कुमशेत येथे पत्रकार राजू डोके तसेच पत्रकार अतुल कांकरीया यांच्या पत्नी स्नेहल कांकरिया वारुळवाडी येथे निवडून आल्या असून बोरी येथून मनीषा औटी या महिला पत्रकार देखील निवडून आल्या आहेत.
यासर्व निवडणुकीचा आढावा घेता, जुन्नर तालुक्यात ओतूर, वारूळवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगाव, आर्वी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, खामुंडी, वडगाव, बोरी, निमगाव सावा, ओझर नं २, हिवरे बुद्रूक गावच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी समजल्या जाणा-या जुन्नर बाजार समितीचे विद्यमान संचालक विपुल फुलसुंदर यांचा पराभव झाला असून माजी संचालक शिरीष उर्फ महेश बो-हाडे यांचा विजय झाला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा सेनेचे गणेश कवडे यांनी आपल्या ओझर ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व मिळवले आहे. येडगाव येथील निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित गुलाब शेठ नेहरकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. वडगाव कांदळी येथे माजी सरपंच संजय खेडकर यांच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. तर वारुळवाडी येथे लागोपाठ तिसऱ्यांदा उद्योजक संजय वारुळे यांच्या नेतृत्वाखालील गणपीर बाबा पॅनल ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ओतुर येथील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निर्विवाद विजय मिळवला आहे. गुंजाळवाडी आर्वी येथे माजी सरपंच युवराज शिंदे यांनीदेखील विजय मिळवला आहे.