आदर्शवत ! मतदानानंतर नळवणेत विरोधकांचे ‘चहापान’

बेल्हे दि.१५ (विभागीय संपादक रामदास सांगळे):- नळवणे येथील मतदान शांततेत पार पडले.शुक्रवार (दि.१५) रोजी मतदान झाल्यावर सर्व मतभेद विसरून दोन पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्ते चहा पाण्यासाठी एकत्र आले होते.विरोधक चहापाण्यासाठी एकत्र आल्याने वेगळा आदर्श गावाने दिल्याने नळवणे गावच सर्वत्र कौतुक होत आहे.
नळवणे (ता.जुन्नर) गावात ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या तर ७ जागेसाठी मतदान शांततेत पार पडले. गावात दिवस अखेर ८५ टक्के मतदान झाले. बाबाजी शिंदे व तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराया ग्रामविकास पॅनल तर बाळासाहेब गगे व हौशीराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराय परिवर्तन पॅनल या दोन्ही पॅनल चा प्रचार जोरदार झाला तसेच दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते मतदान झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी एकत्र जमले होते.चहापाणी वेळी आपापसातील सर्व मतभेद विसरून गावच्या विकासावर चर्चा झाली. यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे व मॉडर्न इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे यांनी यावेळी ग्रामस्थांना गावचा एकोपा व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. निवडणूका येतात जातात परंतु निवडणुक प्रक्रियेमध्ये गावाचं नाव खराब होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारचं इथून पुढेही निवडणुकीत गालबोट लागू नये असे आवाहन गावातील तरुणांना केले. तसेच गावातील भावी पिढी सुद्धा अशाच प्रकारे मतदान प्रक्रियेत सहभागी होईल अशी आशा बाबाजी शिंदे यांनी व्यक्त केली. आदर्श गाव म्हणून आता नळवणे गावची चर्चा तालुक्यात होत आहे.