मतदारांना पाच लिटरचे तेलाचे कँड वाटून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वडगाव कांदळी येथील दोघांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भोरवाडी, वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे मतदारांना पाच लिटर चे सोयाबीन तेलाचे कँड वाटप करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडल्याने येथील दोन जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वडगाव कांदळी येथील महाविकास आघाडी पॅनल चे कुंडलिक रामभाऊ सोनवणे व साहिल अनील भोर (राहणार वानेवाडी व भोरवाडी) या दोन जणांवर निवडणूक प्रचाराच्या आदेशाचे पालन न केल्याने तथा आचारसंहितेचा भंग केल्यामुळे भा.द.वि. कलम १७१ (इ), १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देविदास दगडू भोर (राहणार भोरवाडी) यांच्या घरात घडली.


या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी दिली. असून बुधवार दिनांक १४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वरील दोघांनी महाविकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांना मतदान करावे या उद्देशाने देवीदास दगडू भोर यांना पाच लिटर मापाचे तेलाचे तीन कँड देत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले.
भोरवाडी येथे मतदारांना वस्तूंचे वाटप होत असल्याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना समजली होती. या माहितीवरून त्यांनी त्याचवेळी निवडणूक बंदोबस्ताच्या निमित्ताने वडगाव कांदळी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ ही कारवाई केली. या घटनेचा तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *