शहरातील रस्त्यावर एलईडी पथदिवे बसविणार नामदेव ढाके

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी १४ जानेवारी – महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत नॅशनल स्ट्रिट लाईट प्रोग्राम (NSLP) अंतर्गत उर्जा बचतीच्या अनुषंगाने पारंपारिक पथदिव्यांच्या ठिकाणी उर्जा बचत करणारे एलईडी पथदिवे बसविणेकरीता केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड (EESL) या कंपनीच्या माध्यमातून एलईडी दिवे बसविणेकरीता करारनामा केलेला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचा ४ जून २०१८ च्या शासन निर्णयानुसार यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पारंपारिक दिव्यांच्या ठिकाणी एलईडी दिवे खरेदी न करता एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून उर्जा बचत करणारे एलईडी दिवे बसविणे बंधनकारक केले आहे. याकरीता महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या एलईडी पथदिव्याव्यतिरिक्त दिव्यांच्या ठिकाणी ईईएसएल च्या माध्यमातून एलईडी पथदिवे बसविणेकामी पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र.४५५ दि.०७/०९/२०१९ व मा.स्थायी समिती सभा ठराव क्र.५७२०दि.१८/०९/२०१९ अन्वये मंजूरी मिळाली आहे.


ईईएसएल या कंपनीच्या माध्यमातून पिंपरी महानगरपालिकेच्या रस्त्यावरील पारंपारिक पथदिवे बदलून त्याऐवजी उर्जा बचत करणा-या एलईडी फिटींग बसविणेकामी रस्त्यावर,उद्यान व खेळांचे मैदान इ.ठिकाणी पथदिव्यांचा सर्वेचे काम करण्यात आलेले असून विविध प्रकारचे व क्षमतेचे मिळून पथदिव्यांची संख्या एकूण ८३४९१ आहे. सन २०१२-२०१३ पासून महापालिकेमार्फत उर्जा बचत करणारे ४९७४८ इतके एलईडी दिवे बसविणेत आलेले आहेत. व उर्वरीत ३३७४३ एलईडी पथदिवे बसविणे बाकी आहे.


सदरचे पारंपारिक दिवे काढून एलईडी पथदिवे बसविताना ५०% उर्जा बचत होईल व सध्याच्या दिव्यांच्या रस्त्यावरील प्रकाशा इतकेच किंवा त्यापेक्षा जादा प्रकाश पडेल या क्षमतेचे दिवे बसविण्यात येणार असून बदलण्यात येणा-या दिव्यांच्या संख्येनुसार वीजयुनीट मध्ये किमान ५० % बचत होणार आहे. ईईएसएल मार्फत पुढील आठवड्यात एलईडी पथदिवे बसविणेचे काम सुरू करण्यात येत असून त्यापुढील तीन महिन्यात काम पुर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरीता महापालिकेस सुरवातीस कोणताही खर्च करावा लागणार नाही. सदर प्रकल्पासाठी एकूण अंदाजे ४० कोटी खर्च अपेक्षित आहे. बसविण्यात येणा-या दिव्यांच्या वॅटेज व संखेनुसार सर्व करासह येणा-या खर्चाच्या एकूण रकमेनुसार ८४ हप्त्यामध्ये महापालिकेकडून प्रत्येक महिन्याला ईईएसएल यांना अंदाजे ५० लाख एवढे बील रक्कम अदा करण्यात येणार आहे.


या कामामुळे महापालिकेच्या सर्व रस्त्यावर उर्जा बचत करणारे फक्त एलईडी दिवे असणार आहेत. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *