पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय मंत्री मंडळात घेणार : राजेश टोपे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

बातमी दत्ता गाडगे विभागीय संपादक : –
केंद्र सरकारच्या नियमानुसार पोलीस, डॉक्टर यांना करोना कालावधीत सेवा देताना मृत्यू झाल्यास, संबधिताच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले जात आहे. आता पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने, पत्रकारांना देखील ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या या मागणीसाठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच योजनेची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभुमीवर आरोग्य, पोलिस कर्मचाऱ्याबरोबर पत्रकारही आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करत असल्यामुळे पत्रकारांनाही विमा कवच द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सरकारकडे, करुन वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला.

दरम्यान बुलढाणा येथे 3 जून रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बाबत घोषणा केली होती मात्र शासकीय आदेश निघाला नव्हता. दरम्यान महाराष्ट्रात, गेवराई संतोष भोसले, लातूर मध्ये गंगाधर सोमवंशी,तर नंदुरबार जयप्रकाश डिगराळे व आता पुण्यात पांडुरंग रायकर या चार पत्रकारांचा कोराेनामुळे मृत्यू झाला. याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सरकारला घोषणेची आठवण करुन देत दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबियांना 50 लाखांची मदत करावी अशी मागणी लावून धरली, अखेर आरोग्य मंत्र्यांनी या बाबत पुण्यात राज्यमंत्रिमंडळात निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबियांना न्याय मिळणार आहे.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पत्रकार हे प्रत्येक ठिकाणी वार्तांकन करण्यास जातात. अशा परिस्थितीत त्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्यादृष्टीने येत्या काळात अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहोत. तसेच, राज्य सरकार पत्रकारांच्या बाजूने कायम असून ५० लाखाच्या विमा कवचाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली आहे व ते निर्णयाच्या बाजूने आहेत. त्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

राज्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. तशी बरे होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. पण मृतांची संख्या ही चिंतेची बाब आहे. आज अनेक रुग्ण अखेरच्या क्षणी उपचारासाठी दाखल होतात आणि अशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *