मांजरवाडी येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

स्विफ्ट कार सह 1250 ग्रॅम गांजा जप्त

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
मांजरवाडी (तालुका जुन्नर) येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींवर नारायणगाव पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या पथकाने मांजरवाडी येथील हॉटेल मनोरंजन समोर आरोपी वैभव संजय राऊत (वय २३, राहणार मांजरवाडी) व अभिषेक शंकर शिवले (वय २४, राहणार नारायणगाव) या दोघांना चारचाकी (एम एच १४ एच झेड ७३३३) मध्ये १२५० ग्रॅम वजनाचा सुमारे १५ हजार रुपयांचा गांजा वाहतूक करत असताना ताब्यात घेतले. या शिवाय या दोघांकडून गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. या आरोपींवर एन डी पी एस कायदा कलम ८ क , २० क या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार शंकर जन्म, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस हवालदार तावरे यांनी केली.

या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक झिंजूर्के हे करीत आहेत.