बेल्ह्यात विहीरीत आढळला मायलेकीचा मृतदेह
जुन्नर (वार्ताहार):-
बेल्हे (ता.जुन्नर) येथील बाजारसमितीच्या हद्दीत असणाऱ्या विहिरीत माय लेकीचा मृतदेह सोमवार (दि.३१) आढळून आला आहे. या बाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की बेल्हे गावातील बाजार तळावरील विहीर साधारण ६० फुट खोल असणाऱ्या विहीरीत सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला विहिरीत दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले.

सदर व्यक्तीने तात्काळ ही माहीती गावकामगार पोलिस पाटील बाळकृष्ण पिराजी शिरतर यांना दिली. पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.मृतदेह बाहेर काढल्यावर हे मृतदेह शितल संतोष भालेराव (वय ४० वर्ष) रा.बेल्हे व मुलगी आर्या संतोष भालेराव (वय ५ वर्ष) रा.बेल्हे या मायलेकीचे असल्याचं शीतल भालेराव यांचे पती संतोष भालेराव यांनी ओळखले.

या दोघी रविवार (दि.३०) राञीपासुन घरातुन निघुन गेल्या होत्या. या वेळी आळेफाटा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक फौजदार एस. एम. भवारी, पोलिस नाईक संदिप फड, नरेंद्र गोराणे, एम. एस. पठारे, मोहन आनंदगावकर तातडीने घटनास्थळी हजर झाले. व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.