श्री क्षेत्र ओझर गणपतीची चांदीची छत्री आरोपींच्या घरात

ओतूर पोलिसांनी लावला शोध .

ओतूर:-दि.२७.अष्टविनायका पैकी एक असलेल्या व राज्यातील असंख्य गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात दिड किलो वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री आणि दानपेटीमधील रक्कम २७ जुलैला चोरट्याने लांबविली होती.

यामुळे संपूर्ण तालुक्यात तसेच गणेश भक्तांमधे खळबळ उडाली होती धार्मिक स्थळी घडलेली घटना समजताच पोलीस प्रशासन तपासला सरसावले मात्र काही केल्या या चोरीचा धागा दोरा लागेना, पोलिसांनी श्वान पथक,हस्त रेषा तज्ञ यांना देखील पाचारण केले होते. श्री ओझर गणपती मंदिरातील सी.सी. टी.व्ही.मध्ये या चोरीचा प्रकार कैद झाला होता यामध्ये दोघे जण चोरी करताना दिसत होते मात्र हे दोघे कोण? हा सवाल सर्वत्र भेडसावणारा ठरत होता, याचा पोलिसांनी तपास कसा लावायचा? हे एक पोलिसांसमोर आव्हानच होते.मात्र हा तपास लागला आणि संपूर्ण गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही यामुळे अवघ्या गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आरोपी समवेत डी वाय एस पी दीपाली खन्ना, ए पीआय परशुराम कांबळे व पोलीस कर्मचारी.

याबाबत जुन्नर उपविभागीय कार्यालयात पत्रकारांना अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, आळेफाटा पोलिसांकडून संदीप सखाराम पतवे ( वय ३० ) व विठ्ठल महादू पतवे (वय ४५ ) दोघेही रा. (कळस खुर्द, ता.अकोले, जि.अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेवून कसून चौकशी करीत तपास केला असता त्यांनी ओझर येथील गणपती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचेवर भा.द.वि.कलम ४५७,३८०,३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच आरोपींकडून मंदिरात चोरी करण्यासाठी मदत केलेल्या लक्ष्मण विठ्ठल पतवे,अविनाश पांडुरंग सावंत (रा.कळस,ता.अकोले,जि.अहमदनगर) या दोघांची नावे सांगितलेली आहेत. तसेच पंधराशे रुपयाची रोकड आणि मंदिरातील चांदीची छत्री दगडाने ठेचून चेपवलेल्या अवस्थेत सदर आरोपींच्या राहत्या घरी कपाटात लपवलेल्या अवस्थेत निष्पन्न झाले आहे.

सदर चोरीतील सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ही कामगिरी उपविभागिय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे,पोलिस नाईक विकास गोसावी,पोपट मोहरे,हेड कॉंस्टेबल पंकज पारखे,देविदास खेडकर,नवनाथ कोकाटे यांनी केली असुन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कष्टडी मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक तपास ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे हे करित आहेत.

ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरातील चोरीचा एक महिन्याचे आत व गणेशोत्सव काळातच तपास लावला असल्याने गणेश भक्तांमधे आनंदाचे वातावरण आहे.
वेळोवेळी अनेक घटनांमध्ये पोलिस विभाग टिकेचे वाटेकरी असतात मात्र कोरोना संसर्ग प्रादुर्भाव काळात पोलिसांनी ताणतणावात देखील भाविकांच्या भावना जाणुन जलद गतीने तपास लावल्याने पोलिसांवरील टिकेचे संकट विघ्नहर कृपेनेच टळले अशी चर्चा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

*आरोपींनी चोरी करण्यासाठी वापरलेली कटावनी,स्क्रु चावी,बॅटरी,पहाना,टॉमी व कोयता,दुचाकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *