कोरोना काळातील उत्कृष्ठ कामगिरीवर ठपका ठेवणे हा डॉक्टरांचा अवमानच – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नव्याने पीजी इन्स्टीटयूट स्थापन करण्यात आले आहे. या पीजी इन्स्टीटयूट मध्ये अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी एकूण १०४ जागा शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने या जागांसाठी रितसर जाहिरात देऊन उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यापैकी ७४ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली त्यातून ३२ डॉक्टर हे सद्यस्थित वाय.सी.एम. रुग्णालयात सेवा देत आहेत.

वाय.सी.एम. रुग्णालयातील पीजी इन्स्टीटयूट मधील डॉक्टरांच्या कायमस्वरुपी नियुक्तीसाठी काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीस ठेवण्यात आला होता. यामध्ये तात्पुरत्या स्वरुपातील डॉक्टर, कोरोना रुग्णासाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, पॅरामेडीकल कर्मचारी, सुरक्षानिरिक्षक, रुग्णवाहिका वाहनचालक व वर्ग ४ चे कर्मचारी तसेच घंटागाडी कर्मचारी यांना मनपा सेवेत कायम करण्याची उपसुचना देखिल मांडण्यात आली होती.

कोरोना काळात कोरोना रुग्णांची सेवा करण्या-या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्य शासनाचे निर्देश लक्षात घेता हा विषय सभेत मांडण्यात आला होता. या विषयावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षातील महापौर व विरोधी पक्षनेते पद भुषविलेले असणा-या योगेश बहल यांनी मात्र डॉक्टरांच्या कोरोना काळातील उत्कृष्ठ कामगिरीवर ठपका ठेवत या विषयाला विरोध दर्शविला तसेच डॉक्टर भरतीत लाखो रुपयांची देवाण घेवाण झाल्याचे बेछूट आरोप करत डॉक्टरांच्या अस्मितेवर गदा आणून अवमान केला आहे. वास्तविक वायसीएम रुग्णालयातील पीजीआय साठी केलेल्या डॉक्टर भरती संदर्भात मा. आयुक्त यांचे दालनामध्ये सर्व गटनेते, पदाधिकारी व प्रमुख नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत सर्व भरती प्रक्रिया संदर्भात चर्चा झाली होती. डॉक्टर भरतीची गरज ‍विचारात घेवून विषय मंजूर करण्यावर एकमत देखिल झाले होते. असे असतानाही स्वत:ची दुकानदारी बंद होणार म्हणून त्यांचा पोटसूळ उठला व त्यांनी त्या भितीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण न ठेवता थेट डॉक्टरांवर व त्यांच्या कामगिरीवर आरोप केले आहेत. कुठल्याही विषयाची योग्य ती माहिती न घेता बोलायचे म्हणून बोलावे हे महापौर व विरोधी पक्षनेते पद भुषविलेल्या बहल यांना न शोभणारे आहे.